नवी दिल्ली – गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे येत्या १७ मार्च रोजी आमने-सामने येण्याची शक्यता आहे. दोघेपण एनडीएकडून पंतप्रधानपदाच्या उमेदवार म्हणून रेस मध्ये आहेत. दोघे पण वेगवेगळ्या ठिकाणी कार्यकर्माच्या निमिताने सभेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे त्यांच्यातील शब्दयुद्ध आगमी काळात रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपच्यावतीने १७ मार्च रोजी मुंबईत मोदींचा सत्कार केला जाणार आहे. तर तिकडे दिल्लीत त्याच दिवशी जनता दल युनायटेडच्यावतीने नितीश कुमार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे याकडे सर्व राजकीय विश्लेषकाचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसापासून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार रालोअने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा, अशी मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर १७ मार्च रोजी, एकाच दिवशी नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांचे सार्वजनिक कार्यक्रम होत आहेत. मुंबई भाजपाध्यक्ष राज पुरोहीत यांनी मोदींच्या सत्कारासाठी सोमय्या मैदानात महारॅलीचे आयोजन केले आहे. तर दिल्लीत रामलीला मैदान येथे नितीश कुमार यांची सभा यशस्वी करण्यासाठी जेडीयुचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.
दुसरीकडे मात्र दिल्लीत भाजपचे वरिष्ठ नेते आगामी काळात लवकरच एक बैठक घेणार आहेत. या बैठकीत मोदींना एखादी राष्ट्रीय स्तरावरची जबाबदारी देण्याबाबत विचार विनमय करणार आहेत. असा निर्णय झाला तर भविष्यात आपले महत्त्व वाढवण्यासाठी नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार या कार्यक्रमाचा उपयोग शक्तीप्रदर्शनासाठी करून घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन मात्तब्बर नेत्याच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.