परभणी – सध्या राज्यभरात दौरे करून मी पक्ष बांधणीचा प्रयत्न करीत आहे. त्या प्रयत्नांचा परिणाम लोकसभा व विधानसभा निवडणुकांत दिसेल. पक्ष बांधणी करीत असताना युतींच्या भरवशावर पक्ष बांधता येत नाही. हे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेसोबत काहीच बोलणार नसल्याचा पुनरुच्चार केला.
आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका हेच लक्ष्य ठेवले आहे. त्यानुसारच मी काम करीत असल्याचे मत ठाकरे यांनी व्यक्त केले.
सोमवारी सायंकाळी परभणी येथे त्यांचे आगमन झाले. या ठिकाणी त्यांनी पत्रकारांशी गप्पा मारल्या. याप्रसंगी त्यांच्या समवेत मनसेचे आमदार बाळा नांदगावकर उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे म्हणाले की; महाराष्ट्रातील सर्वात सभ्य भाषण मीच करतो. याचा इतिहासाचा दाखला सुध्दा तपासता येईल. महाराष्ट्रातील ६३ टोलनाके बंद केल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले आहे. ते सर्व यश मनसेच्या आंदोलनाचे आहे. यातील काही तांत्रिक बाबी आंदोलनाने सुटणार नाहीत म्हणून त्याबाबतची प्रकरणे न्यायालयात पाठविली आहेत; असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान; राज ठाकरे यांचे परभणी शहरात आगमन झाल्यानंतर मनसे कार्याकर्त्यांनी त्यांचे स्वागत फुले उधळून केले. राज ठाकरे यांची परभणी व परिसरात सभा न झाल्याने जनतेचा हिरमोड झाला आहे.