भंडार्‍यात मशाल मोर्चात १५ जण होरपळले

भंडारा: जिल्ह्यातील मुरमाडी येथील तीन चिमुरडींवर बलात्कार करून हत्या केल्याच्या निषेधार्थ रविवारी काढलेल्या मोर्चात जळत्या मशालीमुळे एका कार्यकर्त्यांच्या हातातील ध्वजाने पेट घेतला. त्यात १५ जण भाजले असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना नागपूरच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

मुरमाडी अत्याचाराच्या निषेधार्थ रविवारी विविध राजकीय पक्षांनी भंडार्‍यातील हुतात्मा चौक ते गांधी चौक असा मशाल मोर्चा काढला. ३०० ते ४०० कार्यकर्ते त्यात सहभागी झाले होते. गांधी चौकात हा मोर्चा आला असता एका कार्यकर्त्यांच्या हातातील ध्वजाने पेट घेतला. त्यात तो भाजल्याने अन्य कार्यकर्त्यांनी भीतीने मशाली खाली टाकल्या. त्यामुळे आगीचा भडका उडाला.
त्यात गीता कापगते, भाजपच्या कार्यकर्त्यां सायली ढोके व नितीश सूर्यवंशी हे ७५ टक्के भाजले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जिल्हा परिषद सदस्य गीता कापगते व सायली ढोक यांना नागपूरला हलविण्यात आले. इतरांवर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर युनिटमध्ये उपचार सुरू आहे.

मुरमाडी येथील तीन सख्ख्या बहिणींवर अत्याचार करुन त्यांचा खून करण्यात आला. या घटनेला १० दिवसांचा कालावधी लोटूनही आरोपींचा थांगपत्ता लागला नाही. या घटनेच्या निषेधार्थ आज सायंकाळी भाजपचे आमदार नाना पटोले, शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय मशाल मोर्चाचे आयोजन केले होते. शेकडोंच्या संख्येने महिला, पुरुष या मोर्चात सहभागी झाले होते. शास्त्री चौकातून शांततेत निघालेला हा मोर्चा गांधी चौकात आल्यानंतर सभेला सुरूवात झाली पटोले यांचे भाषण सुरू असताना एकाच्या हातातील मशाल खाली पडली. या मशालीने रौद्ररुप धारण केले. यातच चेंगराचेंगरी झाली.