नवी दिल्ली: मोबाईल उद्योगामध्ये प्रिपेड ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी अर्थात ट्रायने घेतला आहे. कमीत कमी बॅलन्स असणार्या प्रीपेड मोबाइल कार्डधारकांना वीस किंवा त्यापेक्षा कमी बॅलन्स असणार्या मोबाइलधारकांचे कनेक्शन ९० दिवसांपूर्वी ‘इनअॅक्टिव्ह’ न करण्याचा आदेश कंपन्यांना देण्यात आला आहे.
हा निर्णय २२ मार्चपासून लागू करण्यात येणार आहे. किमान २० रुपये बॅलन्स असणारे प्रीपेड कनेक्शन बंद करण्यासाठी अथवा ’इनअॅक्टिव्ह’ करण्यासाठी ९० दिवसांची मुदत देणे आवश्यक आहे. या नियमाची तरतूद ’ ट्राय ’ च्या ’टेलिकॉम कन्झ्युमर प्रोटेक्शन रेग्युलेशन’ मध्ये (टीसीपीआर) करण्यात आली आहे. प्रीपेडधारकाच्या नावावर वीस रुपयांपेक्षा अधिक रक्कम असल्यास तो कार्ड वापरत असो अथवा नसो, सेवा बंद करता येणार नसल्याचेही त्यात म्हटले आहे.
देशातील २० कोटी प्रीपेड कार्ड तीस किंवा त्याहून अधिक दिवस वापरात नसल्याचे दिसून आले आहे. संबंधित कार्ड कायमस्वरूपी ’इनअॅक्टिव्ह’ करण्यासाठी ग्राहकाला किमान १५ दिवसांची पूर्वसूचना देणे आवश्यक असल्याचेही या नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.