पुणे: बारावीच्या परीक्षेमागील शुक्लकाष्ठ गेल्या काही दिवसपासून संपण्याचे नाव घेत नाही असे दिसत आहे. इंग्रजीच्या पेपरमध्ये चुकीचा प्रश्न छापल्याने सात मार्क देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. त्यातच बोर्डाचा आणखी एक प्रताप उघडकीस आला आहे. ‘ तुमच्या वडिलांचे निधन झाले आहे. हा शोक संदेश कळवणारे पत्र तुमच्या भावाला लिहा ‘, असा प्रश्न बारावी बोर्डाच्या उर्दू विषयाच्या प्रश्न पत्रिकेत विचारण्यात आल्याने, सारेच चक्रावून गेले आहेत.
बारावीच्या उर्दूच्या पेपरमध्ये पत्रलेखनात ‘ तुमच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यासंदर्भातील निरोप लिहिणारे पत्र भावाला लिहा ‘ असाच प्रश्न देण्यात आला. या प्रश्नामुळे बारावीचा हा पेपर सोडविणारे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. संबंधीत परीक्षकाविरुद्ध कठोर कारवाई करावी , अशी मागणी होत आहे. अनेक मुस्लिम विद्यार्थ्यांनी यावर संताप व्यक्त करीत हा प्रश्नच लिहिण्याचे टाळले आहे. पत्रलेखनाला पर्याय दुसऱ्या पत्राचा असला तरी मुळात उर्दूच्या परीक्षकाने असा प्रश्न देऊन काय साध्य केले , असा प्रश्न विद्यार्थ्यांनी केला आहे. या प्रकाराने विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि पालकांत संतापाची लाट पसरली आहे. उर्दू भाषिक शिक्षक संघटनानीही या प्रकारचा निषेध केला आहे.
दरम्यान, शनिवारी झालेल्या इंग्रजी विषयाच्या ‘ ब ‘ पेपरमधील प्रश्न क्रमांक पाचमध्ये विचारण्यात आलेले आठपैकी सात प्रश्न चुकीचे आढळले आहेत. त्यामुळे ते प्रश्न सोडवण्याच्या प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना सात मार्क देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. ‘ ब ‘ या प्रश्नपत्रिकेत ‘ अनसीन पॅसेज ‘ च्या प्रश्न क्रमांक पाच ‘ अ ‘ आणि ‘ ब ‘ मध्ये चूक आढळून आली आहे. यामध्ये उताऱ्यावरून प्रश्न सोडवायचे असतात. मात्र , विचारण्यात आलेले प्रश्न हे उता-या बाहेरचे असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी ते सोडवण्याचा प्रयत्न केला त्यांना सात मार्क्स देण्यात येणार असल्याचे बोर्डाचे राज्याचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी स्पष्ट केले.
सोमवारी फिजिक्स विषयाचे दोन्ही पेपर होत असल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी फिजिक्सचे दोन पेपर दोन वेगवेगळ्या दिवशी घेतले जात असत. मात्र , यावेळी दोन्ही पेपर एकाच दिवशी विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आहेत.