सुवर्ण मध्य काढायला हवा

गेल्या काही वर्षांपासून भारतातल्या साम्यवादी चळवळीला गळती लागली आहे. या विचाराचे प्रतिनिधित्व करणार्याष दोन्ही पक्षांची नवी सदस्य नोंदणी घटली आहे आणि तरुण वर्ग या पक्षांकडे आकृष्ट होत नाही. भारतात  तरुण वर्गाला आकृष्ट करू शकेल तोच पक्ष मोठा होतो असा अनुभव गेल्या ३० वर्षांपासून येत आहे. म्हणूनच काँग्रेसची संघटनात्मक पातळीवर कितीही दुरवस्था झाली असली तरीही त्या पक्षाचे नेते काहीही करून तरुणांना कसे आकृष्ट करता येईल यावर भर देत असतात.

दोन्ही कम्युनिष्ट पक्षांच्या अवनतीलाही तरुणांचा पाठींबा नसणे कारणीभूत ठरले आहे. काल दिल्लीत काही साम्यवादी नेते एकत्र जमले होते. त्यांनी कम्युनिझमला इतके वाईट दिवस का आले यावर मूलगामी विचार केला. कम्युनिझमला केवळ भारतातच नाही तर सार्याे जगातच वाईट दिवस आले आहेत. तेव्हा फारच मूलगामी विचार करायचा झाला तर जगातच या विचाराची अवनती का झाली याचाही विचार करावा लागेल. दुसर्यार महायुद्धानंतर पन्नास वर्षे अमेरिका आणि रशिया यांच्यात शीतयुद्ध सुरू होते. या दोन महाशक्तींनी जगाला साम्यवादी आणि भांडवलशाही अशा दोन गटात विभागून त्यांचे नेतृत्व केले होते. तेव्हा रशियातील साम्यवादी विचारवंत निम्मे जग लाल झाले असल्याचे सांगत होते.

पाच दशकांनंतर रशियाचे महाशक्ती म्हणून आणलेले उसने अवसान गळून पडले. रशियाने बळाने काही लहान लहान देशांना अंकित करून सोविएत संघ निर्माण केला होता. त्याचे विघटन झाले. रशिया एकटा उरला आणि त्यानेही साम्यवादाला सोडचिठ्ठी देऊन मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली असल्याचे जाहीर केले. चीन आणि रशियाला साम्यवादाची मक्का आणि मदिना म्हटले जात होते. या दोन्ही पीठातला साम्यवाद संपला. रशियाने तो जाहीर करून संपवला तर चीनने तसे जाहीर केले नाही पण  चीनने रशियाच्या आधीच मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार करून  साम्यवादी अर्थव्यवस्था सोडून दिली होती.

प्रत्यक्षात निम्मे जग कधी लाल झालेच नव्हते. जे देश साम्यवादी विचाराखाली आले असल्याचे म्हटले गेले होते तिथे तिथल्या कम्युनिष्टांची सरकारे रशियाच्या मदतीने सत्तेवर आली होती एवढेच. त्यामुळे रशियातला साम्यवाद संपताच त्याही देशातला कथित साम्यवाद संपला. ज्यांचा साम्यवादाला मुळातच विरोध होता त्यांना तर आनंदच झाला. त्यांनी जगातला साम्यवाद संपला असल्याचे टाळ्या वाजवून जाहीर केले आणि खुल्या धोरणांचे स्वागत केले. आता अशा लोकांना  मुक्त अर्थव्यवस्थेचेही काळे अंतरंग कळायला लागले आहे. साम्यवादातही काही दोष आहेत. या विचारातले सर्वंकष सरकारीकरण घातक असते. त्यामुळे उत्पादनाला आणि  विकासाला चालना मिळत नाही. ज्या ज्या देशांनी दीर्घकाळ  ही विचारसरणी राबवली त्यांचा अनुभव तसाच आहे. पूर्व जर्मनी, उत्तर कोरिया, चीन आणि रशिया ही त्याची चांगली उदाहरणे आहेत.

विकासाला चालना मिळाली नाही की रोजगार वाढत नाही. गरीब आणि श्रीमंत यांच्यातली विषमतेची दरी रुंद होते. संपत्तीचे वितरण समान होते पण मुळात संपत्तीच वाढली नसल्याने ते गरिबीचे वितरण ठरते. अशी स्थिती आली की, समाजाच्या बहुसंख्य वर्गात असंतोष पसरतो आणि लोक साम्यवाद झुगारून देतात. मुक्त अर्थव्यवस्थेत उत्पादनाला चालना मिळते. रोजगार वाढतो पण गरिबांचे हाल होतात. विषमता फार वाढते. तिच्यातून मग लोक साम्यवादाची मागणी करायला लागतात.  म्हणजे या दोन्ही व्यवस्था परस्परांच्या प्रतिक्रिया आहेत.  एकीचे चटके बसायला लागले की दुसरीची मागणी होते आणि दुसरीतले दोष डाचायला लागले की पहिलीच विचारसरणी बरी वाटायला लागते.

आता भारतात मुक्त अर्थव्यवस्थेचे गोडवे गायिले जात असले या अर्थव्यवस्थेने निर्माण केलेल्या समृद्धीच्या कथित प्रवाहात आदिवासी, दलित, शेतकरी यांना स्थान मिळालेले नाही. त्यांची स्थिती इतकी वाईट आहे की ते कधीही साम्यवादी विचाराकडे आकृष्ट होऊ शकतात. या स्थितीमुळेच या देशातल्या साम्यवादी शक्तींना कधी ना कधी आपले दिवस येतील असे वाटायला लागले आहे. त्यांचा हा विश्वास खरा ठरून देशातला मोठा वर्ग साम्यवादाकडे आकर्षला गेला तरीही साम्यवादातल्या काही अंगभूत दोषांचे चटके त्यांना काही काळाने बसणारच आहेत.

तेव्हा आपल्या देशातल्या साम्यवाद्यांनी काही तरी नवे निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. साम्यवादातली दडपशाही आणि मुक्त अर्थव्यवस्थेतला आर्थिक स्वैराचार यातला मध्य काढून काही तरी नवे मॉडेल समोर ठेवले पाहिजे. हा नवा पॅटर्न उत्पादनाला चालना देणारा साम्यवाद किवा समतेला प्राधान्य देणारी मुक्त अर्थव्यवस्था असा काही तरी असला पाहिजे. पण तसा विचार ते करताना दिसत नाहीत. खरे तर त्यांच्या हातात प. बंगालची सत्ता ३५ वर्षे होती. तिथे त्यांनी साम्यवाद राबवला आणि दारिद्र्य पिकवले. नंतर देशात मुक्त अर्थव्यवस्थेचे वारे वहायला लागल्यावर त्यांनीही तीच अर्थव्यवस्था स्वीकारली. त्यांनी आपल्या अनुभवातून या दोन विचारातला सुवर्णमध्य काढायला हवा होता. तसे झाले असते तर देशातले तरुण त्यांच्याकडे आकृष्ट झाले असते.