बोगस डॉक्टरांविरुद्ध मोहीम राबविणारः फौजिया खान

परभणी: जिल्ह्यात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणार्‍या डॉक्टरांविरुध्द व्यापक शोध मोहीम राबविणार असल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रा. फौजिया खान यांनी जाहीर केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंगनिवडीस प्रतिबंध) आढावा बैठक व कार्यशाळेत त्या बोलत होत्या. प्रारंभी राज्यमंत्री प्रा. खान यांनी जिल्ह्यात स्त्री-पुरुष जन्मदराचे प्रमाण वाढल्याबद्दल समाधान व्यक्त केले. पूर्वी दर हजार मुलांमागे मुलींची सं‘या ८६६ होती. सध्या हे प्रमाण दर हजार मुलांमागे ९३५ झाल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात आरोग्य, शिक्षण, पोषण जनजागरण व जनसंवाद मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वी पार पाडल्याबद्दल त्यांनी सर्व संबंधितांचे आभार मानले. या पुढील टप्प्यात ग्रामीण भागात जनतेशी संवाद साधतांना बोगस वैद्यकीय व्यवसाय करणार्‍या डॉक्टरांचा मुद्दा उपस्थित केला जाईल, व जनतेच्या मदतीने अशा बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन कारवाई करण्यात येईल, असेही राज्यमंत्री प्रा. ङ्गौजिया खान म्हणाल्या.

सोनोग्राफी केंद्रचालकांकडून भरण्यात येणार्‍या एफ फॉर्मबाबत असलेल्या सूचनांवर राज्यस्तरावर सकारात्मक विचार करु, असे आश्वासन राज्यमंत्री प्रा. खान यांनी दिले. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत अर्भक सापडल्याच्या घटना घडल्या आहेत, त्याचा तपास पोलिस विभागाने गंभीरपणे करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.