रत्नागिरीत विहिरीमध्ये आढळले भुयार

रत्नागिरी: येथील कारवांचीवाडी गावात २१ फूट खोल विहिरीमध्ये सुमारे ६७ फूट लांबीचे भुयार आढळून आले आहे. १२ फूट उंचीच्या या भुयारामध्ये माणसाला सहज वावर करता येत असल्याने ग्रामस्थांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हे भुयार रत्नागिरी शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथील आसरादेवी मंदिराजवळ आढळले आहे. तालुक्यातील कारवांचीवाडी गावामध्ये असणार्‍या आसरादेवी मंदिराजवळ विनायक हरिश्चंद्र मोहिते यांची जमीन आहे. त्या ठिकाणी विहिरीचे काम सुरू होते. गावामधील दामोदर कांबळे यांना विहिरीचे काम देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून हे काम सुरू आहे. विहीर सुमारे २१ फूट खोल खणून झाल्यानंतर गुरुवारी येथे सुरुंग लावण्यासाठी छोटा खड्डा खणण्यात येत होता. पहारीने खड्डा खणत असताना अचानक पहार आतमध्ये गेली. त्यामुळे कांबळे यांनी अन्य साधनांचा वापर करून थोडा मोठा खड्डा तयार केला. बॅटरीच्या सहाय्याने प्रकाश टाकला असता, आतमध्ये मोठी पोकळी असल्याचे त्यांना जाणवले. त्यामुळे त्यांनी सुमारे एक ते दीड फुटाचा गोलाकार खड्डा खणला. त्यामधून आतमध्ये उतरून पाहिले असता, त्यांना येथे भुयार असल्याचे लक्षात आले.

हे भुयार विहिरीच्या दक्षिणेला सुमारे ४५ फूट लांब व उत्तरेला २२ फुटांपेक्षा अधिक लांब आहे. भुयारात उतरल्यानंतर त्याची उंची सुमारे १० ते १२ फूट उंच आहे. या भुयारामध्ये मोठ मोठे जांभा खडक आहेत. यामधून पाणी वाहत असावे. गाळाची मातीही भुयारामध्ये काही ठिकाणी आहे. दोन्ही बाजूने हे भुयार बंद असून, भुयाराला काही ठिकाणी भेगा आहेत. त्यामुळे मोठया प्रमाणात जमिनीखालून पाण्याचा प्रवाह सातत्याने वाहत असावा, अशी शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या भुयारामध्ये काही भागात सातत्याने थेंब थेंब पाणी पडत असल्याने संपूर्ण भुयार ओलसर आहे.