उजनीचे पाणी बारामतीकरांनी चोरले: राज ठाकरे

सोलापूर: सोलापूर जिल्हयात पुरेसे पाणी आहे परंतु त्याचे नियोजन होत नसल्यामुळे जिल्हयावर दुष्काळाचे संकट आले आहे. उजनीचे पाणी या पूर्वीच बारामतीकरांनी चोरले आहे; असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठकरे यांनी केला.

राज्यात सर्वत्र दुष्काळ पसरला आहे. या दुष्काळाचे नियोजन करण्यापेक्षा राज्यातील मंत्री दुष्काळाचे दौरे काढत आहेत. या दौर्‍यातून कांहीही निष्पन्न होत नाही. हे दुष्काळाचे दौरे काढण्यापेक्षा दुष्काळामध्ये होरपळून जात असलेल्या जनावरांना चारा आणि पाणी द्या; असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापूरात पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.

‘मत मागायला नव्हे; मत मांडायला’ हे घोषवाक्य घेऊन राज ठाकरे राज्यभर दौरा करत आहेत. शुक्रवारी सायंकाळी सोलापूरातील नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा होती. सभेपूर्वी सकाळी त्यांनी तुळजापूरात जाऊन तुळजाभवानीचे दर्शन घेतले. त्यानंतर दुपारी शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी गप्पा मारल्या. तसेच विविध विषयांवर चर्चा केली.

राज ठाकरे म्हणाले हा दौरा सभांचा नसून पक्ष बांधणीसाठी आहे. विदर्भाचा दौरा आटोपून अकोला आणि यवतमाळच्या सभेनंतर अमरावतीत आपण आपला दौर्‍याचा समारोप करणार आहोत.

राज्यात दुष्काळ असताना जे दौरे काढले जात आहेत ते भंपकच आहेत. दौरे काढून नेत्यांनी आपले सुकलेले चेहरे शेतकर्‍यांसमोर घेऊन जाऊ नये. दौर्‍यापेक्षा त्यांना चारा आणि पाण्याची थेट मदत करावी. दुष्काळासाठी माझा ठोस असा कोणताही कार्यक्रम नाही. मी विरोधी पक्षात असल्यामुळे केवळ जनतेच्या व्यथा मांडू शकतो. खरे तर या दुष्काळाचे नियोजन सत्ताधार्‍यांनीच केले पाहिजे; असे ठाकरे यांनी सांगितले.

महाराष्ट्रात एकहाती राज्य येऊ शकते; असा विश्वास व्यक्त करून ठकरे म्हणाले की; ज्या राज्यामध्ये एकहाती पक्षाची सत्ता आहे; त्या ठिकाणी प्रगती आहे. मनसेला एकहाती सत्ता दिल्यास राज्याची निश्‍चितच प्रगती होईल असा विश्‍वास जनतेला आपण देत असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले.