‘ई- भामट्या’ नायजेरियन नागरिकांसह सहा जण गजाआड

ठाणे – मलेशियामधील एका बेटावर अडकलो असून त्सुनामी आणि समुद्रीचाच्यांनी आपणास घेरले आहे. असा भावनिक ई-मेल करुन एका महिलेची तब्बल २२ लाखांची ङ्गसवणूक करणार्‍या एका नायजेरियन नागरिकांसह सहा जणांना ठाणे गुन्हा शाखा सायबर सेल व आर्थिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने अटक केली आहे.

फेसबुकच्या माध्यमातून आर्थिक गंडा घातल्याची ही बहुधा पहिलीच घटना असून यात चार ते पाच कोटींच्या फसवणुकीचा पर्दाफाश होण्याची शक्यता पोलीस आयुक्त के.पी. रघुवंशी यांनी वर्तवली आहे. अभुल आयमन (२५) या नायजेरीयन नागरिकासह सागर दिलीप माईनकर या वारंवार नावे बदलणार्‍या 34 वर्षीय तरुण आणि मोहम्मद नौशाद उर्फ विकी (२७), मंगेश जाधव (३१), कमलेश सोनी (४७), किशोर जयंतीलाल सोनी (५४) या मुंबई उपनगरात राहणार्‍यांना १९ फेब्रुवारीला अटक केली.

या टोळीने राबोडीतील महिलेस फेसबुकवर ईमेलद्वारे भावनिक आवाहन केले. तसेच आपल्याकडील ५ लाख पौंड, क्रेडीट कार्ड, चेकबुक्स आदी साहित्य आंतरराष्ट्रीय कुरीअरच्या माध्यमातून या महिलेस पाठवण्याचे आमीष दाखवले. त्यांच्या या जाळ्यात ही महिला अडकली. त्यानंतर कुरीअर, कंपनी, मलेशियातील टॅक्स, कस्टम अधिकारी आणि अन्य सोपस्कार पार पाडयासाठी विविध बँकांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यास या महिलेस प्रवृत्त केले.

परंतु २२ लाख रुपये भरुनही हाती काहीच लागत नव्हते किंबहुना या आरोपींची पैशाची मागणीही थांबत नव्हती. तेव्हा, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलेने पोलिसात फिर्याद दाखल केली.

मोबाईलद्वारे ग्रुप एसएमएस, ई मेल, फेसबुक, चॅटींग द्वारे अनेकजण आमीष दाखवतात. त्यामुळे वापरकर्त्यांनी आपला पर्सनल अकाउंट कोड कुणाला शेअर करु नये. अपरिचितांशी सलोखा वाढवू नये; असे आवाहन पोलीस आयुक्त के.पी.रघुवंशी यांनी केले आहे. साधारण ८ ते ७० वयोगटातील व्यक्ती सायबर क्राईमच्या बळी ठरतायत. यासाठी वारंवार जनजागृती करुनही मीरारोड, रे रोड आणि नवी मुंबईतील भाड्यांच्या घरात राहणार्‍या नायजेरीयन टोळ्यांनी उच्छाद मांडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.