राज्यपाल भेट; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर संजय राऊतांची टीका


मुंबई – राज्यातील प्रश्न अथवा समस्या घेऊन थेट राज्यपालांना भेटणे हा महाराष्ट्राचा अपमान असून राज्यात सरकार लोकनियुक्त आहे, त्याचबरोबर लोकांनी निवडून दिलेले सरकार आहे. कोणताही प्रश्न अथवा समस्यांसाठी पहिल्यांदा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटले पाहिजे. राज्यपालांना कार्यकार अधिकार नसल्याचे म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

संजय राऊत यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. ते त्यावेळी म्हणाले, राजभवनात राज्यपालांनी निवांत राहावे, केंद्राकडून त्यांची नेमणूक होते, पण राज्यपालांवर राज्याच्या तिजोरीतून खर्च केला जातो. राज्यपालांना राजकारण करायचे असेल तर त्यांनी राजभवनाच्या बाहेर यावे, मैदानात येऊन राजकारण करा, घटनात्मक पदाचा सन्मान राखतो ही आमची भूमिका आहे. वीजबिलासाठी कोणी राष्ट्रपतींकडे गेले नव्हते, २ जी घोटाळ्यात मंत्र्यांची नावे आली होती, म्हणून राष्ट्रपतींकडे गेलो होतो. शरद पवार आमचे नेते आहेत. शरद पवारांना राज्यपाल नेता मानतात, त्याचे स्वागत करतो. पण राज्यपालांनी त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्यांना पंतप्रधान, राष्ट्रपतींकडे पाठवायला हवे. शरद पवारांचे राज्यपालांना जर मार्गदर्शन हवे असेल, तर मी पवारसाहेबांना विनंती करेन की तुम्ही राज्यपालांना मार्गदर्शन करा. राजभवन हा राजकारणाचा अड्डा बनू नये, अशी टीकाही संजय राऊतांनी राज्यपालांवर केली.