भारत बंदला हिंसक वळण; एकाचा मृत्यू

मुंबई/नवी दिल्ली: कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ बुधवारपासून दोन दिवसांसाठी पुकारलेल्या देशव्यापी संपाला हिंसक वळण लागले असून हरियाणा रोडवेजच्या एका कर्मचा-याचा हिंसाचारादरम्यान मृत्यू झाला.

हरियाणातील अंबालामधील ट्रेड यूनियन नेता नरेंद्र सिंह यांची बुधवारी सकाळी अंबाला बस स्थानकाजवळ चाकू भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. नरेंद्र सिंह ट्रेड यूनियन एआईटीयूसीचे खजिनदार होते. बस स्थानकातून बस बाहेर काढण्यास त्यांनी विरोध केला. यावेळी काही अज्ञात समाजकंटकांनी त्यांची चाकू भोसकून हत्या केली. मात्र या प्रकारानंतरही बंद चालूच ठेवणार असल्याचे एआईटीयूसीचे सरचिटणीस गुरुदास दासगुप्ता यांनी सांगितले.

दिल्ली येथे ऑटो-टैक्सी बंद आहे. सुमारे ७० हजार रिक्षाचालक संपात सहभागी झाले आहेत. दिल्लीत डीटीसी या सरकारी बसेस चालवणा-यांनी संपकाळात एक हजार अधिक गाड्या चालवून प्रवाशांना दिलासा दिला आहे. दिल्लीत साडेपाचहजार सरकारी बसेस रस्त्यावर धावत आहेत. दिल्ली मेट्रो रेल्वे सुरळीत चालू आहे. दिल्ली आणि कोलकाता वगळता देशभरात संपाला फारसा प्रतिसाद मिळालेला दिसत नाही.

मुंबईतही संपाचा कोणताही परिणाम दिसला नाही. बँका वगळता मुंबईतील सर्व व्यवहार सुरळीत सुरु आहेत. रेल्वे, बस, रिक्षा आणि टॅक्सी वाहतूकही सुरळीत चालू आहे. दिल्ली आणि कोलकातामध्ये रिक्षा संघटना संपात सामील झाल्याने येथील रस्त्यांवर तुरळक वाहने धावताना दिसत आहेत. या संपात डाव्या – उजव्या कामगार संघटना सहभागी झाल्यामुळे या संपाचा परिणाम केवळ बँक व्यवहारावर होणार आहे.

देशातील ११ मातब्बर कामगार संघटनांनी देशव्यापी बंदची हाक दिलेली असली तरी देशाची आर्थिक राजधानी मुंबई काही अपवाद वगळता सामान्यपणे सुरु असल्याचे चित्र आहे. मुंबईत लोकल, बस, टॅक्सी तसेच रिक्षा सुरू आहेत. शरद राव यांच्या हिंद मजदूर सभेच्या रिक्षा-टॅक्सी युनियन संपात सहभागी झाल्या नाहीत. तसेच शिवसेनेच्याही केवळ औद्योगिक कामगार संघटनाच संपात सहभागी झाल्यामुळे मुंबईतील रिक्षा-टॅक्सीची वाहतूक सुरळीत असल्याचे सकाळपासून दिसत आहे. बेस्टच्या बसेस नेहमीप्रमाणेच धावत आहेत. रेल्वे कामगार संघटनाही संपात सहभागी नसल्यामुळे मुंबईतील तीनही मार्गावरच्या लोकल्स सुरळीत असल्याचे चित्र आहे.

बँक कर्मचा-यांना संपात सहभागी होण्यासाठी कोणतेही कारण नाही. मागण्यांतील कोणताही मुद्दा बँक कर्मचा-यांना लागू पडत नाही, असे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची मंगळवारी सरकारशी चर्चा झाली. परंतु ती निष्फळ ठरली. संपामुळे २० हजार कोटींचे नुकसान होण्याची शक्यता आहे.