
मुंबईः मराठी भाषिकांसह अनेक राजकीय पक्षांनी मराठीची चीड येते असल्याचे म्हणत मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या गायक जान सानू विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. कलर्स वाहिनीने हा वाद अधिक चिघळण्यापूर्वीच सावध पावले उचलत झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत झालेली चूक मान्य करत माफी मागितली आहे.
जान कुमार सानूच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कलर्स वाहिनीचा माफीनामा
बिग बॉसच्या १४व्या पर्वात प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. जान कुमार सानूने बिग बॉसच्या एका एपिसोडदरम्यान निक्की तांबोळीशी बोलताना मराठी भाषेची चीड येते, असे वक्तव्य केले होते. यामुळेच शिवसैनिक न मनसेच्या कार्यकर्त्यांनी जानने मराठी भाषेचा अपमान केला असल्याचे म्हणत बिग बॉसविरोधात आक्रमक पवित्रा हाती घेतला होता. तसेच, मराठी भाषेचा अपमान केल्याप्रकरणी जानने माफी मागावी अशी, मागणीही जोर धरु लागली आहे. हा वाद अधिक वाढण्याआधीच कलर्स वाहिनीकडून माफीनामा जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत कलर्स वाहिनीने माफी मागितली आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात कलर्स वाहिनीने २७ ऑक्टोबरचा बिग बॉसचा प्रसारित झालेल्या भागातून जान सानूने केलेल्या वक्तव्यांचा तो भाग हटवण्यात येत आहे. मराठी भाषिक व भारतातील सर्व भाषिक प्रेक्षकांच्या भावनांचा आम्ही आदर करतो, असे स्पष्टीकरण वाहिनीकडून देण्यात आले आहे.
