नाट्यपरिषदेच्या निवडणुकीत बोगस मतदानाची धुळवड

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून नाट्य परिषदेच्या निवडणुकीचा विषय चांगलाच चर्चेत आला होता तो या निवडणुकीतील दोन मातब्बर अभिनेत्यांनी एकमेकांवर केलेल्या आरोपांमुळे! या आरोपांना वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. कारण मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचे उघडकीस आले आहे.

एकूण मतदार ६०४९ असताना प्रत्यक्षात त्याहून अधिक ७३ मतपत्रिका आल्या. या ७३ बोगस मतपत्रिका आढळल्याने अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित झाली आहे. या निवडणुकीत बोगस मतदान झाले असून ही निवडणूक प्रक्रिया रद्द करून पुन्हा नव्याने निवडणुका घ्यायला हव्या; असे मत नटराज पॅनेलचे विनय आपटे यांनी नोंदवले.

मतपेट्या पळवणे वा बोगस मतदान करणे ही उत्तर भारताची मक्तेदारी असताना हा प्रकार महाराष्ट्रात कसा होतो; असा खोचक प्रश्न आपटे यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी उत्स्फूर्त पॅनलचे मोहन जोशी यांनी केली आहे.

निवडणूक अधिकारी जो निर्णय देतील तो आपल्याला मान्य असेलही जोशी यांनी सांगितले. जेवढ्या मतपत्रिका मतदारांना पाठवल्या त्यातल्या अनेकांना त्या मिळाल्याही नाहीत. असे असताना जास्त मतपत्रिका आल्याच कशा असा प्रश्न उपस्थित झाला आहे.