
मुंबई – जेव्हापासून राज्यातील सत्तेवर महाविकास आघाडीने कब्जा केला आहे, तेव्हापासून हे सरकार लवकरच कोसळेल असे भाकित विरोधक असलेल्या भाजपने अनेकदा वर्तवले आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावरुन रविवारी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात भाजपचा चांगलाच समाचार घेतला. हिंमत असेल तर माझे सरकार पाडून दाखवा, असे थेट आव्हानच त्यांनी भाजपाला दिले.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजपवर उद्धव ठाकरेंची सडकून टीका
भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, जेव्हापासून मी मुख्यमंत्री झालो आहे, तेव्हापासून माझे सरकार अमूक तारखेला पडेल असे, वारंवार ऐकत आहे. पण तसे काही अद्यापही घडलेले नाही. तुमच्यात जर हिंमत असेल तर पुढे जा आणि ते करुन दाखवा. महामारीच्या संकटातून देश जात असताना केंद्र सरकारची नजर बिगर भाजप राज्यातील सरकारे पाडण्याकडे होती. भाजपच्या सत्तेच्या या लोभामुळे देश सध्या अराजकतेच्या दिशेने चालला आहे. आपल्या या वृत्तीमुळे भाजप सहकाऱ्यांना गमावत आहे. आता तर एनडीएही संपली आहे. मैत्रीची भाषा ते करतात आणि त्यानंतर त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसतात. ते नितीशकुमार यांनाही बिहारच्या विधानसभा निवडणुकीनंतर अशीच वागणूक देतील, अशा शब्दांत दसऱ्या मेळाव्यात मुख्यमंत्री ठाकरेंनी भाजपावर चहू बाजूंनी हल्लाबोल केला.
भाजपने मंदिर खुली न केल्यावरुन मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले जात आहे. यावर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुनही भाजपला सुनावले. थाळ्या-घंटा बडवणारे तुमचे हिंदुत्व असेल पण शिवसेनेचे हिंदुत्व हे दहशतवाद्यांना बडवणार असल्याचेही ते म्हणाले. कंगना राणावतचा मुद्दा, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या यावरून महाराष्ट्राची बदनामी करणारे या मातीशी बेईमानी करणारे असून तोंडात शेण भरून गोमूत्राच्या गुळण्या केल्या आहेत. ते आता गिळा व ढेकर देऊन गप्प बसा, असे ठाकरी भाषेतील फटकारेही उद्धव यांनी लगावले.
