बंगळूरू: भारतीय लोकशाही हे जगात एक आदर्श अशी प्रशासन व्यवस्था आहे. समाजातील सर्व घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व द्यायला हवे आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सरकारने मतदान करणे सर्वांना कायद्याने बंधनकारक केले पाहिजे; अशी सूचना उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी यांनी केली.
बंगळुरू येथील एका राष्ट्रीय शिक्षण संस्थेतील विद्यार्थी व शिक्षकांसमोर ते बोलत होते. देशातील निवडणूक व्यवस्थेत मोठ्या सुधारणांची गरज असल्याचे अन्सारी यांनी यावेळी सांगितले. सध्याचे अनेक लोकप्रतिनिधी मतदारसंघातील एकूण मतांपैकी जेमतेम 25 टक्के मते घेऊन निवडून येतात. हे लोकप्रतिनिधी खर्या अर्थाने सर्व समाजाचे प्रतिनिधित्व करीत नाहीत. हे चित्र बदलण्यासाठीच निवडणूक सुधारणांची गरज आहे; असेही उपराष्ट्रपती म्हणाले.
विद्यमान निवडणूक नियमांत सुधारणा करावी, प्रत्येक पात्र मतदाराला मतदानाची सक्ती करावी; विजयी उमेदवाराला किमान 50 टक्के मते मिळविण्याची अट असावी; प्रत्येक समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व द्यावे; उमेदवारांच्या पात्रतेच्या निकषांचा फेरविचार करावा; या दुरुस्त्या करताना व्यापक व खुला दृष्टिकोन ठेवावा; संसदेमधील गोंधळावर कायमस्वरूपी उपाययोजना हवी; अशा सुधारणा उपराष्ट्रपतींनी सुचविल्या.