मुंबईत तरुणीवर सामूहिक बलात्कार

ठाणे – सातार्‍याहून प्रियकराला भेटण्यासाठी मुंबईला आलेल्या किशोरवयीन तरुणीची फसवणूक करुन तीन जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

ठाणे रेल्वे पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक एच. एस. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर पिडित तरुणीला तिच्या प्रियकराने भेटण्यासाठी डोंबिवली येथे बोलवले होते. दि.१६ जानेवारीच्या रात्री दहा वाजता ही तरुणी ठाणे रेल्वे स्थानकात उतरली. तिथून तिने प्रियकराला संर्पक साधण्याचा प्रयत्न केला पण संर्पक होऊ शकला नाही. रात्रीच्या वेळी रेल्वेस्थानकात एकटया असणार्‍या या तरुणीवर गोपाळकृष्ण दासहाश्रीची (वय २७) नजर पडली. त्याने या तरुणीला मदत करण्याच्या बहाण्याने घाटकोपर येथील आपल्या घरी नेले व तेथे तिच्यावर बलात्कार केला.

दुसर्‍या दिवशी त्याने या मुलीला गोवंडी येथे रहाणार्‍या राजेंद्र भास्कर नायडू (२०) या दुसर्‍या आरोपीच्या ताब्यात दिले. नायडूनेही या मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिसर्‍यांदा या मुलीला विश्वेशन लक्ष्मण बेंडू (२५) या आरोपीच्या ताब्यात देण्यात आले.

या मुलीचा विश्वास संपादन करण्यासाठी बेंडूने या मुलीबरोबर साईबाबा मंदिरात विवाह केला. काही दिवस पीडित तरुणीचा उपभोग घेतल्यानंतर सात फेब्रुवारीला त्यानेही या मुलीला सोडून दिले. सदर तरुणीने ठाणे रेल्वे पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर १० फेब्रुवारीला तिला तिच्या वाई येथील घरी पाठवण्यात आले. तिन्ही आरोपींविरोधात ३६३, ३६६ (अ), ३७२ (ड) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.