७० वर्षानंतर प्रथमच अमेरिकेत महिलेला मृत्युदंड

फोटो साभार अमर उजाला

अमेरिकेत ७० वर्षानंतर प्रथमच एका गुन्हेगार महिलेला मृत्युदंडाची शिक्षा दिली जाणार आहे. ८ डिसेंबर रोजी या महिलेला विषाचे इंजेक्शन देऊन मृत्युदंड दिला जाईल. गर्भवती महिलेचा गळा आवळून खून केला आणि तिचे पोट फाडून पोटातील अर्भक पळवून नेल्याचा आरोप तिच्यावर आहे आणि तिने गुन्हा कबुल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार २००४ मध्ये पाळीव कुत्रा खरेदी करण्याचा बहाणा करून बॉबी स्टीनेट या महिलेच्या मिसुरी येथील घरात लिसा मोंटगोमेरी ही महिला घुसली होती. स्टीनेट त्यावेळी आठ महिन्यांची गरोदर होती. लिसाने स्टीनेटची गळा आवळून हत्या केली आणि नंतर तिचे पोट फाडून त्यातील अर्भक घेऊन ती फरारी झाली होती. त्यावेळी लिसा ३८ वर्षाची होती. तिला पोलिसांनी अटक केली होती. २००८ मध्ये तिला न्यायालयाने दोषी ठरविले होते.

अमेरिकेत २० वर्षांच्या बंदीनंतर तीन महिन्यांपूर्वी पुन्हा मृत्युदंड देण्याची शिक्षा अमलात आणण्यास परवानगी देण्यात आली आहे. १९५३ मध्ये महिलेला मृत्युदंडाची शेवटची शिक्षा अमलात आली होती. अमेरिकेत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्या गेलेल्या गुन्हेगारात २ टक्के महिला आहेत. त्यातील लिसा ही नववी गुन्हेगार आहे.