अफझलची फाशी ही राजकीय खेळी: राज ठाकरे

सातारा: संसदेवरील भीषण हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी अफझल गुरूला देण्यात आलेली फाशी ही केंद्र सरकारची राजकीय खेळी असल्याचा थेट आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. हे सरकार भंपक, ढोंगी आणि कारस्थानी असून येत्या काळातील निवडणुका डोळ्यापुढे ठेवूनंच अफझलला फासावर लटकवण्यात आले; अशा शब्दात त्यांनी हल्ला चढवला.

राज ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौर्‍याला आज सातार्‍यातून सुरुवात झाली. इथे त्यांची जाहीर सभा होणार नसल्याने शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी अफझल गुरुच्या फाशीबाबत त्यांनी परखड भाष्य केले आणि केंद्र सरकारला धारेवर धरले.

देशविघातक कारवाया करणार्‍या दहशतवाद्यांना दहा-अकरा वर्षांनी फाशी होते; ही दुर्दैवाची गोष्ट आहे; असे नमूद करून ठाकरे म्हणाले की; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही सहा वर्षांनी अफझलला फाशी देण्यात आली. ही फाशी म्हणजे राजकीय खेळीच आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला देशातल्या आठ-दहा राज्यांच्या निवडणुका होत आहेत. त्या डोळ्यापुढे ठेवूनच ही फाशी दिली गेली आहे, अशी सडेतोड टीका राज यांनी केली.