राज्यात ६३ हजार पोलिसांची भरती करणार- सतेज पाटील

पंढरपूर: राज्यातील पोलीस दल सक्षम करण्यासाठी ६३ हजार पोलिसांची भारती करणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मनुष्यबळ कमी पडत असेल तर अतिमहत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा कमी करून नागरिकांना सुरक्षा पुरवा; असे सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच सुनावले आहे. या पार्श्वभूमीवर गृह राज्यमंत्र्यांनी भरतीबाबतच्या निर्णयाची माहिती दिली.

कारागृहात घडणारे गैरप्रकार, कैदी पळून जाण्याचे वाढते प्रमाण आणि कैद्यांमधील भांडणे रोखण्याच्या दृष्टीने येरवडा, तळोजा आणि आर्थर रोड कारागृहात सीसी टीव्ही केमेरे बसविण्यात येतील; असेही पाटील यांनी सांगितले.

अन्नातील भेसळीचे प्रमाण वाढते असून अन्न आणि औषध विभागातील अपुरे मनुष्यबळ आणि तपासणीच्या सुविधांचा अभाव यामुळे भेसळ करणाऱ्यांवर आणि भेसळयुक्त पदार्थ विकणार्यांवर कारवाई करण्यास मर्यादा येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन अन्न आणि औषध प्रशासन विभागही अधिक सक्षम करण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यात भेसळ तपासणीची प्रयोगशाळा उभारण्यात येणार असून फिरती प्रयोगशाळाही विकसित करण्यात येणार असल्याचे पाटील म्हणाले.