राम मंदिरासाठी मोदींना पंतप्रधान करा: धर्मसंसद

अलाहाबाद: महाकुंभमध्ये विश्व हिंदू परिषदेची धर्मसंसद सुरु आहे. यात सुमारे ५ हजार साधू-संत सहभागी झाले आहेत. या भव्य सोहळ्यात हिंदुत्व, राम मंदिर, गो संवर्धन, दहशवाद, बांगलादेशी घुसखोर आणि काही मठ, मंदिरांत सरकारने केलेली मालकी, घुसखोरी यावर विस्तृत चर्चा होणार आहे. यात पूर्वोत्तर आणि दक्षिण भारत राज्यांतील साधू-संत यांच्याबरोबरच बौद्ध आणि जैन संत सहभागी झाले आहेत.

या धर्मसंसदेत नरेंद्र मोदी यांचे नाव भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करावे म्हणून कोणताही ठराव अथवा प्रस्ताव पारित होणार नसल्याचे विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रविण तोगडिया यांनी स्पष्ट केले. मात्र धर्मसंसद सुरु झाल्यानंतर मोदी यांच्या नावाचे नारे लावण्यात आले. वासुदेवाचार्य आणि रामानुजाचार्य नावाच्या दोन संतांनी मोदी यांना पंतप्रधान बनविण्याची व्यासपीठावरच जाहीर मागणी केली. मोदी यांचे नावाचा उल्लेख होताच धर्मसंसदेत चौफेर बाजूंनी कार्यकर्त्यांनी सुमारे पाच मिनिटे ‘मोदी जिंदाबाद’चे नारे लावले.

धर्मसंसदेत संतांनी आपले म्हणणे मांडले की, मोदी पंतप्रधान बनल्याशिवाय अयोध्यात राम मंदिर बनणार नाही. विहिंपने मोदी यांचे समर्थन करताना; गुजरातमध्ये मुस्लिम बहुल भागात मुस्लिमांना तिकीट न देता भाजपला मोठा विजय मिळवून दिल्याची आठवण करुन दिली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत धर्मसंसद पोहचलेले आहेत. त्यांनी कांची पीठाचे शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती यांची भेट घेतली.

दुसरीकडे; प्रवीण तोगडिया यांनी धर्माच्या संसदेत राजकीय आखाडा कसा सुरू राहील याची काळजी घेत पुन्हा मुस्लिमांवर हल्ला केला. देशातील हिंदू-ओबीसी बांधवांच्या नौक-या मुस्लिमांना दिल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

याबाबत काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी म्हटले आहे की; श्रीरामाचे मंदिर बांधण्यासाठी कोणाचाही विरोध नाही पण त्यामुळे दुस-यांना त्रास का देता? या मुद्याचे राजकरण करु नये; असा सल्लाही त्यांनी दिला. दुसरीकडे भाजपचा महत्त्वाचा सहकारी पक्ष जनता दल (यू)चे प्रवक्ते शिवानंद तिवारी यांनी म्हटले आहे की; राम मंदिर भाजपचा अजेंडा असू शकतो, एनडीएचा नाही.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सत्ताकाळात भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवाराने बासनात गुंडाळून ठेवलेला रामजन्म भूमी आणि राम मंदिराचा राग सरसंघचालकांनी कुंभ मेळ्याच्या निमित्ताने पुन्हा आळवला. राम मंदिर निर्माणाचा प्रश्न समस्त हिंदूंच्या अस्मितेशी जोडला असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. केंद्र सरकार आणि भगव्या दहशतवादाचे विधान करणारे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावरही त्यांनी कोरडे ओढले.

महा कुंभाच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या धर्म संसदेच्या दुसर्‍या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत यांनी रामजन्मभूमीवर मंदिर उभारणी हे एक आंदोलन असून ते हिंदूंच्या अस्मितेशी निगडीत असल्याचे सांगितले.