नवी दिल्ली: करवसुलीबाबत अर्थसंकल्पात जी उद्दीष्ठे देण्यात आली होती ती साध्य करण्यासाठी महसूल व कर वसुली वाढवण्याची गरज असून अधिकार्यांनी त्यासाठी उर्वरित काळात अधिक प्रयत्न करावेत; असे आवाहन अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी केले आहे. यंदा करवसुलीचे प्रमाण कमी आहे त्यामुळे अपेक्षित उद्दीष्ठ गाठले जाण्याची शक्यता कमी आहे याचा आढावा घेऊन चिदंबरम यांनी करवसुलीसाठी अधिकार्यांच्या मागे तगादा लावला आहे.
चिदंबरम यांनी उत्पादन शुल्क आणि कस्टम विभागाच्या अधिकार्यांची बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. तथापि आर्थिक मंदी, विविध उत्पादन क्षेत्रात घटलेला उत्पादन दर या सार्यांचा परिणाम करवसुलीवर झाला आहे हे त्यांनी मान्य केले. तरीही उर्वरीत काळात अधिकाधिक कर वसुलीसाठी प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन त्यांनी केले.
गेल्या काही काळात औद्योगिक उत्पादनात ०.१ टक्के इतके उत्पादन घटले आहे. आयातही ०.७१ टक्क्यांनी घटली आहे. तसेच देशाचा सरासरी आर्थिक विकास दरही घटला आहे अशी कारणेही कमी कर वसुलीसाठी पुढे केली जात आहेत.