एसआयटीला योगी सरकारकडून हाथरस प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुदतवाढ


नवी दिल्ली – उत्तर प्रदेशमधील बहुचर्चित हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या ‘एसआयटी’ला आज आपला अहवाल सादर करायचा होता. पण एसआयटीला तपासासाठी दिलेला कालावधी दहा दिवसांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आदेश देत वाढवला असल्याची माहिती उत्तर प्रदेशच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे.

या प्रकरणातील पीडितेच्या गावात, ज्या शेतात तिच्यावर हल्ला झाला होता तिथे व जिथे तिला अग्नी देण्यात आला त्या जागेची तीन सदस्यीय एसआयटीच्या पथकाने पाहणी केली आहे. एसआयटीच्या पथकाबरोबर यावेळी फॉरेन्सिक तज्ज्ञ देखील होते. पीडित तरूणीवर हल्ला झाला त्या शेताची त्यांनी पाहणी केली. उत्तर प्रदेशच्या गृह विभागाचे सचिव भगवान स्वरूप, डीजीपी चंद्रप्रकाश आणि पोलीस अधिकारी पूनम यांचा या पथकात सहभाग होता.

मंगळवारी पथकामधील सदस्यांकडून सांगण्यात आले होते की, उद्यापर्यंत आमचा तपास पूर्ण होईल, आम्हाला आशा आहे की राज्य सरकारला आम्ही उद्यापर्यंत रिपोर्ट सादर करू. जर काही कारणास्तव तपास पूर्ण झाला नाही, तर आम्हाला एक-दोन दिवस वाढवून मिळू शकतात.