मुंबई: एखाद्याचे केवळ साम्यवादी विचारप्रणालीकडे असलेले आकर्षण त्याला दहशतवादी घोषित करण्यासाठी पुरेसे ठरू शकत नाही, असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला. पुण्यात पकडलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (माओवादी) चार कथित नक्षलवाद्यांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने हे स्पष्टीकरण दिले.
न्या. अभय ठिपसे यांनी पुण्यात पकडलेल्या धावला ढेंगळे, सिद्धार्थ भोसले, मयुरी भगत आणि अनुराधा सोनुळे या चौघांना प्रत्येकी ३० हजार रुपयांच्या हमीवर जामीन मंजूर केला. या चौघांना एप्रिल २०११ मध्ये दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली होती.
या चौघांविरुद्ध कुठलीही केस तयार करण्यात आली नाही. त्याचप्रमाणे, आरोपींकडून केवळ साम्यवादी साहित्य आणि सीडी जप्त करण्यात आल्याचा युक्तीवाद आरोपींचे वकील मिहिर देसाई यांनी केला.
त्यावर या चौघांचा हिंसाचार घडविण्याचा कुठलाही कट असल्याचे निष्पन्न होत नाही. सामाजिक मुद्दे मांडण्यात त्यांना रस असल्याचे दिसते. सामाजिक मुद्द्यावर आवाज उठविण्यात काहीही गैर नाही, असे न्या. ठिपसे यांनी नमूद केले. आपल्यासारखेच वक्तव्य देशातील अनेक मोठ्या नेत्यांकडून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.