भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात सामील होण्यासाठी हजारो एसएमएस

पुणे दि.४ – जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नव्याने सुरू केलेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात म्हणजे राष्ट्रीय जनतंत्र मोर्चात सक्रीय सहभागी होण्यासाठी त्यांच्या राळेगण सिद्धीतील कार्यालयात दोन दिवसांत अक्षरशः हजारो एसएमएस आले असून त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र, बिहार व उत्तर प्रदेशातील नागरिकांचा समावेश आहे असे समजते.

अण्णांनी बिहारच्या पाटण्यातून या नव्या आंदोलनाची घोषणा ३० जानेवारीला केली होती आणि तेव्हाच देशातील सर्व जनतेला आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहनही केले होते. संपर्कासाठी मोबाईल नंबरही दिला गेला होता आणि ज्यांना सहभागी व्हायची इच्छा आहे त्यांनी एसएमएस करावेत असेही आवाहन अण्णांनी केले होते. त्यानंतर केवळ तीन दिवसांत राळेगण कार्यालयाकडे सहा हजारांहून अधिक नागरिकांनी एसएमएस केले असल्याचे अण्णांचे येथील सचिव दत्ता आवारी यांनी सांगितले.

नागरिकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादाने अण्णा अतिशय आनंदी झाले आहेत असे सांगून आवारी म्हणाले की बिहारमधील कांही उत्साही कार्यकर्ते अण्णांच्या भेटीसाठी राळेगणला आले आहेत. एसएमएस करणार्यां त पदवीधरांची संख्या लक्षणीय आहेच पण विशेष म्हणजे महिला आणि मुलींकडून ३५०० मेसेज आले आहेत. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथूनही सुमारे १२०० मेसेज आले आहेत.

नगरचे डॉ. सुनील गंधे याविषयी बोलताना म्हणाले की अण्णा कांही काळ स्थानिक कार्यकर्त्यांना विसरले होते आणि परराज्यातील कार्यकर्त्यांत गुंतले होते मात्र परराज्यातील समर्थक त्यांच्या लालसेपोटी अण्णांना पाठिबा देत होते हे आता अण्णांना समजून चुकले आहे आणि त्यांना आमची आठवण झाली आहे ही आमच्यासाठी मोठी समाधानाची बाब आहे. आम्ही सर्व जुने कार्यकर्ते अण्णांच्या आंदोलनात सहभागी होत आहोत. बिहारच्या शाम यादव यांनी अण्णा देशाचे दुसरे जयप्रकाश नारायण आहेत आणि देशात ते नक्कीच राजकीय क्रांती घडवितील अशी आशा व्यक्त केली आहे.