भारतीय नागरिकात लोकशाही राष्ट्र म्हणून जगण्याच्या सबंधात म्हणावी तशी जागृती अजून झालेली नाही. आपल्यापैकी बरेच लोक नियमाने मतदान करतात आणि निवडणुका वेळेवर होतात. पण एवढ्याने आपले लोकशाहीतले जबाबदार नागरिक म्हणून असलेले कर्तव्य संपत नाही. देशाच्या कल्याणासाठी अर्थात आपल्याच कल्याणासाठी आपल्याला आपल्या वागण्यात आणि धोरणात बदल करावा लागतो. सध्या असा प्रश्न निर्माण झाला आहे तो सोन्याच्या बाबतीत. भारत हा सुवर्णभुका देश आहे हे सगळ्या जगाला माहीत आहे. तसे सगळेच देश सोन्याचे भुकेले असतात. सर्वच देशांकडे सोन्याचे साठे असतात पण ते सोन्याचे साठे त्या देशांच्या सरकारांनी कमावलेले असतात. ते सरकारच्या ताब्यात असतात. नेमकेपणाने सांगायचे तर ते त्या त्या देशातल्या रिझर्व्ह बँकांच्या ताब्यात असतात.
भारतातही भरपूर सोने आहे पण सरकारच्या ताब्यात नाही तर ते जनतेच्या ताब्यात आहे. ताब्यात आहे म्हणजे हौशी स्त्री पुरुषांच्या गळ्यात, हातात, बोटांत, पायात, नाकात, कानांत गुंतलेले आहे. आपल्या देशातले सामान्यातले सामान्य लोकही सोने बाळगून असतात. आपले सरकार या लोकांपेक्षा गरीब आहे. सोने सरकारकडे असले म्हणजे सरकार त्या सोन्याचा उत्पादक वापर करू शकते कारण त्या सोन्याच्या बदल्यात सरकारला कर्ज मिळू शकते. पण हेच सोने लोकांच्या मालकीचे झाले म्हणजे लोक त्या सोन्याचा वापर केवळ हौस म्हणून करतात. सोने लोकांकडे जाते तेव्हा त्या सोन्यात अडकलेली संपत्ती उत्पादक रहात नाही तर ती अनुत्पादक होते.
अमेरिकेत सरकारचा सोन्याचा साठा ८ हजार १०० टन एवढा आहे. तसा भारताचा रिझर्व्ह बँकेकडे असलेला साठा केवळ ५५७ टन आहे. भारतात जनतेकडे असलेले सोने अमेरिकेच्या रिझर्व्ह बँकेच्या साठ्यापेक्षा किती तरी जास्त म्हणजे २० हजार टन आहे. आपल्या देशातला हा साठा आपण जागतिक बाजारात विकला तर आपण त्यातून येणार्याह पशातून अमेरिकेला विकत घेऊ शकतो पण आपण आपला सोन्याचा साठा केवळ बाळगून असतो. अमेरिकेतला एखादा माणूस खिशात चार पैसे आले तर फ्रिज, कार, ए.सी. अशा सुखसोयीच्या वस्तू खरेदी करील पण भारतीय माणूस चार पैसे मिळाले की त्यातून सोने खरेदी करील. म्हणजे चार पैसे कमावून ते अनुत्पादक करून टाकून साठवून ठेवील. त्यातून सोयीही घेणार नाही आणि ते पैसे गुंतवून एका रुपयाचे दोन रुपयेही करणार नाही.
भारतात सोन्याच्या खाणी नाहीत पण आपण एवढ सोने बाळगून आहोत कारण आपण जे काही कमावले आहे त्यातून परदेशातून सोने खरेदी करून ते साठवत आलो आहोत. आपण सोन्याला धार्मिक महत्त्वही देतो आणि त्यामुळे सोने मोडून काही तरी उत्पादक गुंतवणूक करणे हे पाप समजतो. लोक सोने घेताना, अडचणीला उपयोगी पडेल म्हणून असावे, असे म्हणतात पण प्रत्यक्षात ते सोने मोडण्यास ते सहजासहजी तयार होत नाहीत. असा आपला पैसा अनुत्पादक गुंतला आहे आणि आपल्या गरिबीचे ते मोठेच कारण आहे. आपली घामाची कमाई अशी गुंतवण्याची ही प्रक्रिया शतकानुशतके सुरू आहे आणि अजूनही जारी आहे. त्यामुळे आपल्या रुपयाची किंमत घसरत आहे कारण आपण रुपया देऊन डॉलर घेत आहोत.
आपल्याला डॉलर हवे आहेत कारण सोने खरेदी करायला डॉलरच लागतात. आपण डॉलर खूप खरेदी करत असल्यामुळे रुपया स्वस्त आणि डॉलर त्या तुलनेत महाग झाला आहे. हे डॉलर तेलावर आणि त्या खालोखाल सोन्यावर खर्च होत असतात. आपण असा आपला डॉलरचा साठा सोन्यावर अनावश्यक पणे उधळायला लागतो तेव्हा आपला आयातीवरचा खर्च वाढतो आणि निर्यातीचे उत्पन्न त्यामानाने कमी होऊन आपला आयात-निर्यातीतला फरक अर्थात व्यापारी तोटा वाढायला लागतो. आपल्या देशातले बरेच सोने मंदिरांतही गुंतून पडलेले आहे. केरळातल्या पद्मनाभ स्वामींच्या मंदिरात असे टनांशी सोने तीनशे वर्षांपेक्षाही अधिक काळ केवळ पडून होते. ती संपत्ती आपण उत्पादक कामांत वापरली असती तर देशातली सगळी धरणे पूर्ण झाली असती.
आपल्या देशाचा कायापालट करणार्याे नदी जोड प्रकल्पाचा अंदाजित खर्च आहे पाच लाख कोटी रुपये आणि पद्मनाभ स्वामी मंदिरात केवळ पडून असलेली संपत्ती आहे १० लाख कोटी रुपयांची. आता सरकारने लोकांना सोन्याबाबत सावध करायला सुरूवात केली आहे. सोने जास्त आयात करू नये म्हणून सोन्यावर अधिक आयात कर लावला आहे पण, तरीही सोन्याची आवक काही कमी होत नाही. आपण सर्वांनी एकदा सोन्याच्या बाबतीत काही विचार केला पाहिजे. सोन्यात पैसा गुंतवणे टाळले पाहिजे. याबाबत लोकांत जागृती होण्याची गरज आहे.