बेदी यांचाही टीम अण्णाला अलविदा

नवी दिल्ली: सुधारित लोकपाल विधेयकाबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मतापेक्षा वेगळे मत व्यक्त केल्यानंतर माजी पोलीस अधिकारी आणि टीम अण्णाच्या ज्येष्ठ सदस्य किरण बेदी यांनी टीम अण्णाला अलविदा केले आहे. यापुढे आंदोलनाची सूत्र स्वत: अण्णा आपल्या हाती ठेवणार आहेत.

सरकारने लोकपाल विधेयकाचा सुधारित मसुदा जाहीर केल्यानंतर ‘काहीच नसण्यापेक्षा एक पाऊल तरी पुढे टाकले गेले आहे;’ असे मत व्यक्त करून बेदी यांनी सरकारचे अभिनंदन केले. त्याचवेळी अण्णांनी सरकारी लोकपाल विधेयक निरुपयोगी असल्याचा आरोप करून सशक्त लोकपाल विधेयकासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. सरकारने पुन्हा एकदा फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी केला.

या मतभेदानंतरच टीम अण्णामध्ये ‘ऑल इज वेल;’ नसल्याचा अंदाज आला होता. आता बेदी यांनी दक्षिण दिल्लीत आंदोलनासाठी सुरू केलेले कार्यालय बंद केले आहे. अण्णांचा आता ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’शे काहीही संबंध राहिला नसून आंदोलनाच्या संदर्भात संबंधितानी राळेगण सिद्धी येथे संपर्क साधावा; असे आवाहन बेदी यांनी केले आहे. अण्णांच्या ‘फेसबुक पेज’चे व्यवस्थापन यापुढे आपल्या संस्थेमार्फत केले जाणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले.

यापूर्वी अण्णांचे खंदे समर्थक अरविंद केजरीवाल यांनी राजकारणात शिरकाव करून व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. या मुद्द्यावरून अण्णा आणि केजरीवाल यांचे बिनसले. केजरीवाल यांनी स्थापन केलेल्या आम आदमी पक्षाला आपला पाठींबा नसल्याचेही अण्णांनी जाहीर केले.

यापुढील काळात टीम अण्णाशी केवळ बेदीच नव्हे तर टीम अण्णातील दिल्लीच्या कोणत्याही विद्यमान सदस्यांचा काही संबंध असणार नाही. टीम अण्णा आणि एकूणंच आंदोलकांच्या रचनेत मोठे फेरबदल अपेक्षित असून आंदोलनाची सूत्र स्वत: अण्णा हाती घेणार आहेत. सर्व कामकाज राळेगण येथून चालविले जाणार आहे.

Leave a Comment