चीनी बँका अनिल अंबानींची परदेशी संपत्ती जप्त करण्याच्या तयारीत

चीनच्या तीन बँका उद्योगपती अनिल अंबानी यांची परदेशातील संपत्ती जप्त करत थकबाकी वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. या बँकांनी अनिल अंबानींच्या कंपन्यांना जवळपास 5,276 कोटी रुपये कर्ज दिलेले आहे. इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चाइना, एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ चाइना आणि चाइना डेव्हलपमेंट बँकेने आपल्या अधिकारांचा वापर करत अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असून, याअंतर्गत अंबानी यांची संपत्ती ताब्यात घेतली जाईल.

या प्रकरणात ब्रिटनमध्ये सुनावणी दरम्यान अनिल अंबानी कथितरित्या म्हणाले होते की, त्यांच्याकडे काहीही शिल्लक राहिलेले नाही व ते दागिने विकून न्यायालयीन खर्च भागवत आहे.

चीनी बँकांचे वकील थांकी क्यूसी ब्रिटनच्या न्यायालया म्हणाले की, अनिल अंबानी बँकांना एकही रुपया न देण्यासाठी शक्य तो प्रयत्न करत आहे. आता बँकांनी त्यांची संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. वकील म्हणाले की, ते आपल्या अधिकारांचा पुर्ण वापर करणार आहेत व सर्व कायदेशीर पर्याय वापरले जातील.

दरम्यान, ब्रिटनच्या न्यायालयाने याआधी 22 मे ला आपल्या आदेशात अंबानींना चीनी बँकांचे 5,276 कोटी रुपये आणि 7.04 कोटी रुपये न्यायालयीन खर्च देण्यास सांगितले होते. व्याज जोडून ही रक्कम जूनपर्यंत 5281 कोटी रुपयांवर गेली आहे.