
महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे पठारी थंड हवेचे ठिकाण ऐतिहासिक महत्त्वाचे स्थळ आहे. वसुदेव कृष्णाने रूक्मिणीला पळवून नेले ते येथूनच. भीमाने द्रौपदीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेल्या किचकाचा वध केला तो ही येथेच. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रातील हे असे एकमेव पर्यटन स्थळ आहे ,जेथे कॉफी लागवड केली गेली आहे.

महाभारतात उल्लेख असलेल्या किचकवधाचे नाट्य येथेच घडले असा समज आहे. भीमाने राजा किचकाला ठार मारून येथील दरीत फेकले होते. वास्तविक त्यावरून या ठिकाणाला किचकदरा असे नांव पडले. मात्र इंग्रजीत स्पेलिंग करताना ते चिखलदरा असे केले गेले आणि चिखलदरा याच नावाने हे ठिकाण आता ओळखले जाते. हैद्राबाद रेजिमेंटमधील कॅप्टन रॉबिनसन याने हे ठिकाण पाहिले ते १८२३ साली. डोंगरावरून दिसणारी मनोहारी हिरवाई आणि सप्टेंबर आक्टोबरमध्ये सुरू होणारी पानगळ त्याला इंग्लंडची आठवण करून देत असे.
