
बिजींग- भारताचा विरोध असूनही चीनने ब्रम्हपुत्रा नदीवर तिबेट मध्ये आणखी तीन धरणे बांधण्याची योजना आखली आहे. सध्या तेथे एक धरण बांधले जात आहे त्या खेरीज ही तीन धरणे असतील. या योजनेची चीनने भारताला कोणतीही माहिती अधिकृतपणे दिलेली नाही.

बिजींग- भारताचा विरोध असूनही चीनने ब्रम्हपुत्रा नदीवर तिबेट मध्ये आणखी तीन धरणे बांधण्याची योजना आखली आहे. सध्या तेथे एक धरण बांधले जात आहे त्या खेरीज ही तीन धरणे असतील. या योजनेची चीनने भारताला कोणतीही माहिती अधिकृतपणे दिलेली नाही.
तीन नव्या धरणांचा प्रस्ताव अलिकडेच तेथील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य झाला आहे. दागू, जिआचा, आणि जिझु या तीन ठिकाणी ही धरणे बांधण्याची योजना आहे. चीनच्या बाराव्या पंचवार्षिक योजनेत ही धरणे बांधून पूर्ण केली जाणार आहेत.
या प्रस्तावाविषयी चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्याला विचारले असता त्यांनी सांगितले की सीमा भागातील नद्यांच्या विकास प्रकल्पांबाबत आम्ही नेहमीच जबाबदारीची भूमिका घेतली आहे. धरणांमुळे उद्भवणार्या भौगोलिक स्थितीचा शास्त्रीय अभ्यास करूनच या विषयीचा निर्णय घेतला गेला आहे असे त्यांनी सांगितले.
या धरणाच्या खालच्या बाजूला असलेल्या भारत आणि बांगलादेशला या धरणांचा फटका बसू शकतो त्यामुळे त्यांना याची कल्पना दिली आहे काय; असे विचारता ते म्हणाले, की मला अजून या विषयाची अधिक माहिती घ्यावी लागेल. भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच चीनने हा निर्णय घेतल्याने पुन्हा दोन्ही देशांत तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी अलिकडेच चीनला भेट देऊन तेथील अधिकार्यांशी द्विपक्षीय संबंधांबाबत सविस्तर चर्चा केली होती. नद्यांच्या पाणी वाटपाचा विषयही त्यांच्या चर्चेत आला होता. परंतु यावेळीही चीनकडून भारताला ब्रम्हपुत्रेवर बांधल्या जाणार्या धरणांची माहिती देण्यात आलेली नव्हती.उलट चीन मधून भारतात जाणार्या नद्यांचे पाणी अडेल अशी कोणतीही कृती चीनकडून केली जाणार नाही असे मेनन यांना सांगितले गेले होते.