देशातील वाढत्या कोरोना रुग्णांचा परिणाम, सौदीने घातली भारतीय फ्लाइट्सवर बंदी


सौदी अरेबियाने भारतातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता देशातून येणाऱ्या-जाणाऱ्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. सौदी अरेबियाच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने एक परिपत्रक जारी करत सांगितले की भारत, ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये देशातून जाणाऱ्या-येणाऱ्या सर्व फ्लाइट्सवर बंदी घालण्यात येत आहे. याबाबत एनडीटिव्हीने वृत्त दिले आहे.

‘कोरोना व्हायरसचा उद्रेक झालेल्या देशांशी यात्रेवर बंदी’ शीर्षकाखालील परिपत्रक नागरी उड्डाण प्राधिकरणाने सौदी अरेबियाचे सर्व विमानतळावर, एअरलाईन आणि चार्टेड फ्लाइट कंपन्यांना पाठवले आहे.

सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय प्रवासी राहतात. काही दिवसांपुर्वी एअर इंडिया एक्सप्रेसने सांगितले होते की दुबईच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने 2 कोरोना पॉजिटिव्ह प्रवासी आणल्याने फ्लाइटला 24 तासांसाठी निलंबित केले होते.

भारतात कोरोनामुळे 23 मार्चपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणावर बंदी आहे. मात्र वंदे भारत मिशन अंतर्गत भारत-सौदी अरेबियामध्ये स्पेशल फ्लाइट सुरू आहेत.