राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पाकिस्तानला सज्जड दम भरला. आम्ही मैत्रीचा हात पुढे केला आहे तो आमचा दुबळेपणा समजू नका असा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर त्यांनी देशातल्या आर्थिक विकासातले फायदे गाव, शाळा आणि रुग्णालयांपर्यंत पोहोचले पाहिजेत असेही सरकारला बजावले. तरुण पिढीच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत असेही ते म्हणाले. तरुण पिढीशी बोलताना त्यांच्या पोटात भुकेची आग असेल तर त्यांच्याशी चर्चा कशी करणार असाही सवाल त्यांनी केला. राष्ट्रपती आणखीन बरेच काही काही बोलले. आजवरचे राष्ट्रपती यापेक्षा वेगळे बोलले होते? श्री. प्रणव मुखर्जी राष्ट्रपती झाल्याने राष्ट्रपतींच्या भाषणामध्ये काही फरक पडलाय का?
देशाच्या आर्थिक विकासाचे फायदे गावापर्यंत जाऊ नयेत असे आजवर एकाही राष्ट्रपतींनी म्हटलेले नाही. आजपर्यंतच्या सर्व राष्ट्रपतींनी असेच म्हटलेले आहे. उलट स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासूनच महात्मा गांधींनी शहरातल्या लोकांना खेड्याकडे चलण्याचा आदेश दिला होता. मात्र शहरातले लोक खेड्याकडे गेलेच नाहीत उलट खेड्याकडचे लोक वारंवार पडणार्याद दुष्काळाला वैतागून शहराकडे गेलेले आहेत. शहरातले लोक खेड्याकडे आले नाहीत तरी चालेल पण निदान खेड्यातले लोक तरी शहराकडे जाऊ नयेत आणि त्यांनी खेड्यातच रहावे. त्यांना खेड्यातच चांगला रोजगार आणि त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे एवढे तरी सरकारला करायला हवे होते परंतु सरकारने तेही केले नाही. त्यामुळे खेड्यातली जनता शहराकडे चाललेली आहे. खेडी ओस पडत चाललेली आहेत.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आजवर सहा वेळा केंद्रीय अंदाजपत्रक सादर केलेले आहे. मात्र त्यांच्या एकाही अंदाजपत्रकात खेड्यातल्या लोकांनी शहराकडे जाऊ नये आणि शहरातली समृध्दी खेड्याकडे यावी अशी एकही उपाययोजना केलेली नव्हती. शहरातला पैसा खेड्यात येत नाही म्हणून पश्चात्ताप करणार्याे प्रणव मुखर्जींना स्वतः अर्थमंत्री असताना त्यासाठी काहीच करता आले नाही. त्यामुळे त्यांना आता उपरती झाली आहे. परंतु ही उपरती निरर्थक आहे. कारण त्यांनी सरकारला योग्य आर्थिक धोरणे आखावीत असा सल्ला दिला तरी तो सल्ला सरकार ऐकेलच असे नाही. आता त्यांचे बोलणे निष्प्रभ होत आहे आणि या काळातच ते आर्थिक धोरणे नीट न राबवल्यास देशात नक्षलवाद वाढत जाईल असा इशारा द्यायला लागले आहेत.
प्रणव मुखर्जी यांनी आपल्या भाषणामध्ये नवे काय सांगितले याचा शोध घेतला असता एकच नवी गोष्ट आढळली ती म्हणजे त्यांनी दिल्लीच्या सामूहिक बलात्कार प्रकरणाची आपल्या भाषणात दखल घेतली. आज आपण पिढीच्या बदलाच्या उंबरठ्यावर उभे आहोत आणि इथे उभे असताना देशातल्या परिवर्तनाचा नायक असलेल्या तरुणाचा आवाज आपल्याला ऐकावा लागणार आहे असे त्यांनी म्हटले आहे. खरे म्हणजे पिढीच्या बदलाचा उंबरठा असा काही नसतो. देशामध्ये हर दिन, हर पल बदल होत असतो आणि रोजच बदलाचे एकेक पाऊल पुढे पडत असते. जुन्या पिढीला या दररोज होणार्याच सूक्ष्म बदलाची नोंद संवेदनशीलपणे नित्य घेत राहिले पाहिजे. परंतु ती पिढी त्या कामात चुकली तर कधीतरी अँग्री यंग जनरेशनच्या असंतोषाचा स्फोट होतो आणि जुन्या पिढीला धक्का बसतो.
एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येतो. झटका येण्याच्या आधीचा क्षण आणि झटका आल्यानंतरचा क्षण या दोन क्षणांच्यामध्ये झटक्याचा उंबरठा असतो असे म्हणता येत नाही. सकृतदर्शनी तसे दिसते पण प्रत्यक्षात हृदयविकाराचा झटका येण्याची स्थिती त्यांच्या शरीरात हळूहळू निर्माण झालेली असते. ती स्थिती निर्माण होताना जे बदल होतात त्या बदलांची दखल त्याने घेतलेली नसते. मात्र झटका बसल्यानंतर तो सावध होतो. आपल्या देशातल्या तरुणांच्या संवेदना आणि जुन्या पिढीचा बोथटपणा यातून देशातल्या तरुणांच्या मनातला असंतोष हळूहळू जागा होत होता, पसरत होता मात्र त्याची दखल या नेत्यांनी संवेदनशीलपणे घेतली नाही. देशातल्या सार्यात नेत्यांच्या दृष्टीने त्यांच्यापोटी जन्माला आलेली मुले म्हणजेच पुढची पिढी होती आणि आपल्यानंतर आपली सत्ता आणि पदे आपल्या मुलांना कशी मिळतील यासाठी या सार्याआ नेत्यांनी आपली सारी बुध्दी, शक्ती आणि कौशल्य पणाला लावलेले होते. त्याच एका उद्योगात गुंतलेले असल्यामुळे त्यांना फक्त एकाच तरुणाची मनस्थिती कळली.
श्री. प्रणव मुखर्जी यांच्यासह देशातले सारे पुढारी सरंजामशाहीलासुध्दा लाजवेल इतक्या बेमालूमपणे लोकशाहीत घराणेशाही राबवण्यात आणि तिचे समर्थन करण्यात गर्क होते. त्यांना कसे कळणार गरीब तरुणांच्या मनातली स्पंदने? या गरीब तरुणांना स्वस्त धान्य दिले आणि त्यांची फुटकळ सबसिडी थेट त्यांच्या बँकेत जमा केली की हे तरुण स्वतःला धन्य मानतील. त्यांचे आईवडील सोनिया गांधींचा जयजयकार करत होते. आता हे तरुण तितक्याच जोरकसपणे राहुल गांधींचा जयजयकार करतील. या पलीकडे या पुढार्यां च्या मतीची मजल गेलेली नाही. त्यामुळे ते वारंवार, त्याच त्या छापाची भाषणे करून जनतेला फसवत आहेत. शब्द फक्त वेगळे आहेत.