भारताला गृहीत धरू नका: राष्ट्रपतींचा इशारा

नवी दिल्ली: पाकिस्तानबरोबर भारताला मैत्री हवी आहे. मात्र दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानने भारताला नेहेमी गृहीत धरण्याची चूक करू नये; असा इशारा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिला.

भारताच्या ६४व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाला संबोधित करताना राष्ट्रपती बोलत होते.
भारताला पाकिस्तानबरोबर मैत्रीचे संबंध हवे आहेत. त्यासाठी भारताने नेहेमीच विधायक भूमिका घेतली आहे. मात्र नजिकच्या भूतकाळात भारतीय सैन्याने नियंत्रण रेषेवर घेतलेले अनुभव निराशाजनक आहेत; असे नमूद करून मुखर्जी पुढे म्हणाले की; शेजारी राष्ट्रांमध्ये वाद- विवाद असू शकतात. ते चर्चेने मिटविता येतात. मात्र अशासकीय यंत्रणांच्या मुखवट्याआडून दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचे समर्थन कोणत्याही परिस्थितीत केले जाऊ शकत नाही.

सीमेवर शांतता असावी; अशी भारताची भूमिका आहे. मैत्रीसाठी भारताचा हात नेहेमीच पुढे आहे. मात्र या सहिष्णुतेला हतबलता समजून देशाला कोणी गृहीत धरू नये; असा इशारा राष्ट्रपतींनी दिला.