मुंबई दि.२४ – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८७ व्या जयंतीदिनाचे निमित्त साधून दक्षिण मध्य मुंबई शिवसेना विभागाने महिलांना २१ हजार चाकूंचे वाटप केले असल्याचे समजते. महिलांना स्वसंरक्षण गरजेचे बनले आहे आणि त्यांना जर कोणत्याही प्रकारच्या लैगिक छळाला, छेडछाडीला सामोरे जावे लागले तर हे चाकू नक्कीच उपयोगी ठरतील असे या विभागाचे प्रमुख अजय चौधरी यांचे म्हणणे आहे.
मुंबईतही सध्या महिला मोठ्या प्रमाणावर स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गांना प्रवेश घेत आहेत. मात्र चाकू सतत बरोबर बाळगणे ही कल्पना नवीन असल्याचे चौधरी यांचे म्हणणे आहे. असे शस्त्रवाटप हे कायद्याच्या विरोधात नाही, आपण शहरात बलात्कार घडू नयेत यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या विभागातील महिलांनीही चाकू वाटपाचे समर्थन केले आहे आणि मिरची पावडरपेक्षा हे नक्कीच जास्त योग्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कोणी छेडछाड करू लागला अथवा अंगाशी येऊ लागला तर ऐनवेळी मिरची पावडर सापडेल की नाही याची शाश्वती नाही. मात्र हातात चाकू दिसला तर संबंधित गुन्हेगार नक्कीच पळ काढेल किमान अंगाशी येण्यापूर्वी दुसर्यांादा नक्कीच विचार करेल असेही कांही महिलांनी सांगितले.
शिवसेनाचे कायदेशीर सल्लागार राहुल नार्वेकर याविषयी बोलताना म्हणाले की चाकू अथवा सुरी बरोबर बाळगणे अथवा कोणाला भेट देणे हा गुन्हा नाही. जर तुम्ही एखादा गुन्हा करण्याच्या विचाराने चाकू बाळगला असेल आणि त्यासाठी त्याचा उपयोग केला तर तो गुन्हा होऊ शकेल. आपण आज मुलींच्या संरक्षणाविषयी चर्चा करत असू तर चाकू खिशात असलेला केव्हाही चांगले. तो सहज हाताळता येईल आणि वापरला नाही तरी चाकू आहे म्हटल्यावरच दुसर्यांाना आपोआप जरब बसेल हा त्यामागचा उद्देश आहे.