कोरोना रुग्णांसाठी रुग्णवाहिकेचे योग्य भाडे ठरवा, सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना आदेश


देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रुग्णांना अ‍ॅम्बुलन्स देखील वेळवर मिळत नसल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मिळाल्या तरीही अधिक शुल्क आकाराले जात आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी अ‍ॅम्बुलन्स सेवेसाठी योग्य शुल्क निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने कोरोना रुग्णांकडून जास्त अ‍ॅम्बुलन्स शुल्क वसूल केल्या जाणाऱ्या घटनांवर चिंता व्यक्त केली.

सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी पर्याप्त संख्येत अ‍ॅम्बुलन्स उपलब्ध असतील, हे निश्चित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. सोबतच सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, कोरोना महामारीवर मात करण्यासाठी राज्यांनी केंद्राच्या सुचनांचे पालन केले पाहिजे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे कोरोना रुग्णांना दिलासा मिळणार आहे. कारण आतापर्यंत अ‍ॅम्बुलन्स चालक आपल्या मनाला वाटेल तसे शुल्क आकारत असे. अवघ्या काही किलोमीटर अंतरासाठी हजारो रुपये भाडे मागितल्याच्या घटना देखील महाराष्ट्रात समोर आलेल्या आहेत.