रॅपिड टेस्टमध्ये नेगेटिव्ह आलेल्या लोकांनी पुन्हा चाचणी करावी, केंद्राचे निर्देश


देशात दररोज 90 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 45 लाखांच्या पुढे गेली असून, सरकारकडून टेस्टिंग देखील वाढविण्यात आले आहे. आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना निर्देश दिले आहेत की, कोरोनाची लक्षण असलेले जेवढ्याही रुग्णांची रॅपिड अँटिजन टेस्ट नेगेटिव्ह आलेली आहे, त्या प्रत्येकाची आरटी-पीसीआर चाचणी करावी. जेणेकरून कोरोनाबाधित प्रत्येक व्यक्तीचा शोध घेता येईल.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक तत्वांमध्ये स्पष्ट केले की, रॅपिड टेस्टमध्ये ज्यांचे रिपोर्ट नेगेटिव्ह आले आहेत. मात्र नंतर 2-3 दिवसांनी लक्षण आढळल्यास त्यांची आरटी-पीसीआर चाचणी करणे गरजेचे आहे. जेणेकरून ज्यांची कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आल्याची शक्यता आहे, त्यांची माहिती वेळेवर मिळेल व त्यांना आयसोलेट करता येईल. सोबतच वेळेवर हॉस्पिटलमध्ये दाखल करता येईल.

मंत्रालयाने असेही म्हटले आहे की संसर्गाच्या प्रकरणांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय टीम किंवा अधिकारी यांच्या वतीने त्वरित एक देखरेख यंत्रणा स्थापन केली जावी. ही टीम राज्य आणि जिल्ह्यातील नियमितरित्या होणाऱ्या रॅपिड अँटिजन टेस्टसंबंधी चाचण्यांचे विश्लेषण करेल.