आता आंब्यापासूनही बनणार वाईन

रत्नागिरी: हापूस आंब्यापासून वाईन तयार करण्याच्या प्रयत्नांना दापोली कृषी विद्यापीठातील संशोधकांना यश आले आहे. कच्ची कैरी आणि पिकलेला आंबा या दोन्हीपासून वाईन बनविण्यात आली असून तिचा दर्जा अधिक वाढविण्याचे शास्त्रज्ञांचे प्रयत्न आहेत.

कोकणाचा राजा हापूस आंबा हा देशात नव्हे; तर जगभरात वाखाणला जातो. हापूस आंबा केवळ कोकणात पिकत असल्याने आणि त्याचा अनोखा स्वाद इतर जातीच्या आंब्यात नसल्याने त्याची मोठ्या प्रमाणावर निर्यातही होते. मात्र हे फळ अतिशय नाजूक असल्याने किरकोळ हवामान बदलानेही त्याच्या उत्पादनात मोठा फरक पडून बागाईतदारांचे मोठे नुकसान होते. मात्र आंब्यापासून वाईनचे उत्पादन व्यावसायिक पातळीवर सुरू झाल्यास आंबा बागाईतदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

एकंदरीत वाईनशौकीन आणि आंबा उत्पादक या दोघांच्या दृष्टीने ही ‘गोड’ बातमी आहे. या शिवाय हापूस उत्पादन ही केवळ कोकणाची मक्तेदारी असल्याने आंतराराष्ट्रीय पातळीवर आंब्याच्या वाईन उत्पादनात महाराष्ट्राची; पर्यायाने भारताची मक्तेदारी प्रस्थापित होण्यास वाव आहे. फक्त ‘ग्रेनबेस्ड’ मद्यामुळे गरिबांना भाकरीपुरती ज्वारीही महाग झाली; तसा आंबा दुर्मीळ झाला नाही म्हणजे मिळविले!