महिलांसाठी देशात लवकरंच हेल्पलाईन ‘१८१’

नवी दिल्ली: दिल्ली पाठोपाठ केंद्र सरकारही महिलांना आपत्कालीन मदतीसाठी ‘हेल्पलाईन’ सुरू करणार असून त्यासाठी १८१ हा दूरध्वनी क्रमांक निश्चित करण्यात आला आहे. मात्र याच्या संचालनासाठी राज्य शासनांनी कॉलसेंटर्स स्थापन करावी; अशी सूचना दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे रवाना करणार आहेत.

दिल्लीत धावत्या बसमध्ये युवतीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्यावर दिल्ली राज्यशासनाने महिलांसाठी ३ आकडी दूरध्वनी क्रमांकाची आपत्कालीन हेल्पलाईन सुरू केली आहे. त्याच धर्तीवर संपूर्ण देशभरात १८१ क्रमांकाची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

संकटात असलेल्या महिलांनी या क्रमांकावर दूरध्वनी केल्यावर तो त्या राज्याच्या कॉलसेंटरशी जोडला जाईल आणि आवश्यक ती आपत्कालीन मदत तातडीने उपलब्ध करून देण्यात येईल; असेही सिब्बल यांनी सांगितले.