प्रवाशांची समस्या होणार दूर, 12 सप्टेंबरपासून धावणार आणखी 80 पॅसेंजर ट्रेन

कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर हळूहळू रेल्वे आपली सेवा सुरू करत आहे. प्रवासी कामगारांसाठी आधी रेल्वे सेवा सुरू करण्यात आली होती. याआधी 230 स्पेशल रेल्वे सुरू करण्यात आल्या होत्या. आता 12 सप्टेंबरपासून आणखी 80 नवीन पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यासाठी 10 सप्टेंबरपासून रिझर्व्हेशन प्रक्रिया सुरू होईल. याबाबतची माहिती रेल्वे बोर्ड चेअरमन व्ही के यादव यांनी दिली आहे.

व्ही के यादव यांनी माहिती दिली की, स्पेशल ट्रेन्सच्या संचालनावर लक्ष ठेवले जाईल व जेथे रेल्वेची अधिक मागणी असेल अथवा प्रतिक्षा यादी मोठी असेल तेथे क्लोन रेल्वे चालवल्या जातील. परीक्षा किंवा अन्य कारणांसाठी राज्य सरकारने मागणी केल्यास देखील रेल्वे चालवल्या जातील.

रेल्वेने स्टेशन परिसर आणि प्रवासादरम्यान मास्क घालणे अनिवार्य केले आहे. स्टेशनवर थर्मल स्क्रिनिंगमध्ये जाण्यासाठी प्रवाशांना कमीत कमी 90 मिनिटे आधी पोहचावे लागेल. ज्या लोकांमध्ये कोरोनाचे लक्षण आढळणार नाही, त्यांना स्पेशल ट्रेन्समधून प्रवासाची परवानगी मिळेल. सोबतच सोशल डिस्टेंसिंगचे देखील पालन केले जाईल.