टेंशनमुक्त झाला धोनी; सपोर्टींग स्टाफची कोरोना चाचणी निगेटिव्ह


नवी दिल्ली – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाचा आयपीएल युएईत खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. पण या दरम्यान या स्पर्धेत सामील झालेल्या सर्वच संघांना कोरोना चाचणी महत्वाची होती. त्यानुसार आयपीएल जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या चेन्नई सुपर किंग्सला एकमागून एक धक्के बसले होते. दोन खेळाडूंसह स्टाफ सदस्य अशी एकूण 13 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर स्पर्धेतून उपकर्णधार सुरेश रैनाने घेतलेली माघार सीएसकेसाठी डोकेदुखी ठरणारी असल्यामुळे कर्णधार महेंद्रसिंग धोनी तणावात होता. त्याचबरोबर दीपक चहर आणि ऋतुराज यांच्यासह सपोर्ट स्टाफ सदस्य कोरोनाबाधित आढळल्यामुळे संघातील अन्य सदस्यांना पुन्हा क्वारंटाईन व्हावे लागल्यामुळे त्यांना सरावासाठीही मैदानावर उतरता आले नाही. याच दरम्यान चेन्नई सुपर किंग्ससाठी एक आनंदाची बातमी आली आहे.

चेन्नई सुपर किंग्सचे सदस्यांनाही दुबईत दाखल झाल्यानंतर अन्य संघांप्रमाणे 6 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये रहावे लागले होते. चेन्नईचा संघ 28 ऑगस्टला सरावासाठी मैदानावर उतरणे अपेक्षित होते, पण चहर आणि गायकवाड यांच्यासह स्टाफ सदस्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि संघाचे सर्व गणितच बिघडले. त्यात प्रमुख खेळाडू सुरेश रैनाने वैयक्तिक कारण देत आयपीएलमधूनच माघार घेतली. त्यातच चेन्नईच्या कोरोना पॉझिटिव्ह सदस्यांची पुन्हा चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. त्यांची पुन्हा एकदा कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर 3 सप्टेंबरला सर्व खेळाडू सरावाला सुरुवात करतील. पण, 12 सप्टेंबरपर्यंत चहर आणि गायकवाडला क्वारंटाईन रहावे लागणार आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू फॅफ ड्यू प्लेसिस आणि लुंगी एऩगिडी मंगळवारी पहाटे दुबईत दाखल झाले आहेत. आता त्यांना 6 दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.