नागपूर दि.१६- महाराष्ट्राचे उद्योगमंत्री, काँग्रेसचे वरीष्ठ नेते आणि मंत्रीमंडळात तिसर्यार क्रमांकाचे महत्त्वाचे स्थान असलेले नारायण राणे यांनी नागपूरात भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या घरी जाऊन केलेला नाश्ता आणि त्यांच्या घरात घालविलेली तब्बल वीस मिनिटे यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यातून या काळात या दोघा नेत्यांत नक्की काय बोलणी झाली, कसली खलबते शिजली याची कणभरही माहिती बाहेर न आल्याने विविध तर्कविर्तकांनाही उधाण आले आहे.
मंगळवारी गडकरी यांच्याच पुढकाराने बोटीबोरी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेत बांधण्यात आलेल्या कामगारांसाठीच्या घरांच्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी नारायण राणे नागपूरात आले होते. त्यावेळी उद्घाटनापूर्वी त्यांनी गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन नाश्ता केला व नंतर हे दोघेही कार्यक्रमासाठी रवाना झाले.
राणे यांची ही कृती काँग्रेस नेत्यांना चांगलीच धक्का देणारी ठरली आहे. कारण गेले कांही महिने काँग्रेसने नितीन गडकरी यांच्यावर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना टार्गेट केले आहे. अशावेळी राणे यांनी गडकरी यांच्या घरी जाणे, त्यांच्या कार्याचे कौतुक करणे हे कोडे न उलगडणारे आहे. राणे केवळ महत्त्वाचे मंत्रीच नाहीत तर भविष्यात मुख्यमंत्रीपदाचे दावेदारही आहेत त्यामुळे तर काँग्रेसमध्ये त्यांच्या या वागण्याचा अर्थ लावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत असे समजते.