काँग्रेस कार्यकारिणीत अशोक चव्हाणांची वर्णी ?

मुंबई दि.१५ – आदर्श घोटाळा प्रकरणात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागलेले काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची काँग्रेसच्या कार्यकारणीवर वर्णी लावली जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. आगामी निवडणुकीत चव्हाण यांच्यावर महाराष्ट्राची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचेही याच सूत्रांनी सांगितले. मात्र अशोक चव्हाण यांची निवड जयपूर येथे होत असलेल्या काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींच्या बैठकीनंतरच केली जाईल असे समजते. अशोक चव्हाण यांची कार्यकारणीवर निवड म्हणजे त्यांचे पुनर्वसन असल्याचे समजले जात आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची माळ तशी अनपेक्षितपणेच अशोक चव्हाण यांच्या गळ्यात पडली होती असे मानले जात असले तरी २००९ मधील निवडणुकीत त्यांनी बजावलेली महत्त्वाची भूमिका त्यासाठी कारणीभूत ठरली असेही विश्लेषकांचे मत आहे. मात्र आदर्श घोटाळ्यात अडकल्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले आणि त्यानंतरचा काळ जणू अज्ञातवासात घालवावा लागला. तरीही नांदेडच्या महापालिका निवडणुकांत त्यांनी पुन्हा आपला करिश्मा दाखवून दिला आहे. राज्याच्या राजकारणापासून दूर असले तरी चव्हाण यांची दिल्लीतील उठबस लक्षणीयरित्या वाढली असल्याचे दिसून येत आहे. मराठवाड्यासाठी विलासरावांचे निधन झाल्याने काँग्रेसलाही बलवान नेत्याची गरज भासते आहे आणि ती चव्हाण नक्कीच पुरी करू शकतात असेही राजकीय विश्लेषकांचे मत आहे.