चीनी कंपन्यांकडून भारतीय कंपन्यांना करोडोचा गंडा?

नवी दिल्ली दि.१४ – भारतातील हजारो लघु आणि मध्यम उद्योग कंपन्यांनी चीनी कंपन्यांशी केलेल्या व्यापार करारातून फसवणूक होत असून ही फसवणूक कोट्यावधींच्या घरात गेली असल्याचे माहिती अधिकार कायद्यान्वये मागविण्यात आलेल्या माहितीतून उघड झाले आहे.

याविषयी मिळालेल्या वृत्तानुसार गेल्या दोन वर्षात सुमारे ९२ कंपन्यांनी चीनी कंपन्यांशी माल पुरवठा करण्यासंदर्भात करार केले आहेत. मात्र पैसे घेऊनही योग्य माल न देणे, पैसे घेतल्यावर कंपनीच गुल होणे, अॅडव्हान्स रकमा घेऊन माल न पाठविणे, करार केलेल्या मालापेक्षा कमी प्रतीचा माल पाठविणे अशा अनेक मार्गाने या कंपन्यांची चीनी कंपन्यांनी फसवणूक केली आहे. त्यासंबंधीच्या तक्रारीही संबंधित कंपन्यांनी भारत सरकारच्या वाणिज्य विभागाकडे केल्या आहेत मात्र केंद्र सरकारने या तक्रारी चीनमधील भारतीय दूतावासाला कळविण्यापलिकडे अन्य कोणतेही पाऊल उचललेले नाही असे समजते.

क्रिस्टल इंडिया या मुंबईच्या कंपनीलाही अशा प्रकारे ८० लाख रूपयांना टोला बसला असून वारंवार अर्ज करूनही १ रूपयाचीही वसुली फसवणूक करणार्याह संबंधित कंपनीकडून झालेली नाही असे कंपनी अधिकार्यांंनी सांगितले. तसेच अमृतसर येथील अमर कलर कंपनीला रिफाइन्ड ग्लिसरीनऐवजी पाणी मिश्रित ग्लिसरीन पुरवून सुमारे ३० लाख रूपयांना फसविले गेले आहे. अशा प्रकारे फसविल्या गेलेल्या कंपन्यांची संख्या प्रचंड मोठी असून वारंवार त्यासंबंधी केलेल्या तक्रार अर्जाची दखल घेतली जात नसल्याचे संबंधितांचे म्हणणे आहे. गुजराथमधील उद्योग संघटना, अंकलेश्वर उद्योग संघटना  यांचाही फसवणूक झालेल्या कंपन्यात समावेश असून या कंपन्यांनी ज्या मालाच्या पुरवठ्यासाठी करार केले होते त्यापेक्षा वेगळाच माल त्यांना पाठविला गेला आहे.