नवी दिल्ली: आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये असलेला असंतोष शमविण्यासाठी किंगफिशर एअरलाईन्सचे अध्यक्ष विजय मल्ल्या यांनी त्यांना पुन्हा कंपनी सुरू करण्याचे गाजर दाखविले असले तरीही नागरी हवाई वाहतूक विभागाच्या महासंचालकांनी कंपनीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मल्ल्या करीत असलेली ६५० कोटी रुपयांची तरतूद पुरेशी नसल्याचे मत व्यक्त करून मल्ल्या यांना धक्का दिला आहे.
आर्थिक दुरवस्थेत डबघाईला आलेल्या किंगफिशरचा नागरी हवाई वाहतुकीचा परवाना ओक्टोबर २०१२ मध्ये रद्द करण्यात आला आहे. सात महिन्यापासून वेतन न मिळाल्यामुळे न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत असलेल्या किंगफिशरच्या वैमानिक आणि कर्मचाऱ्यांना मल्ल्या यांनी पत्र लिहून कंपनी लवकरंच पुन्हा सुरू होत असल्याचे गाजर पुढे केले आहे.
मल्ल्या यांनी कंपनी पुनरुज्जीवित करण्यासाठी ६५० कोटी रुपयांची तयारी दर्शवून त्याचा आराखडा सादर केला आहे. मात्र या आराखड्यात विमानतळांची थकबाकी देण्याबद्दलच्या तरतुदीचा काहीच उल्लेख नाही. तसेच हा आराखडा यापुढे कंपनी आवश्यक त्या सेवा खात्रीपूर्वक पुरवू शकेल; याची ग्वाही देऊ शकणारा नाही; असे नागरी हवाई वाहतूक विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
एकेकाळी भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नागरी विमान वाहतूक कंपनी असलेल्या किंगफिशरवर सध्या १३ हजार ६२८ कोटी ३६ लाख रुपयांचे देणे आहे. एक वर्षाच्या कालावधीत एकाही नव्या गुंतवणूकदाराला आकर्षित करण्यात कंपनीला यश आलेले नाही.