राळेगण सिद्धी: पाकिस्तानला धड शिकविण्यासाठी भारताने पुन्हा सन १९६५ प्रमाणे कठोर लष्करी कारवाई करण्याची आवश्यकता ज्येष्ठ समाजसेवक आणि माजी सैनिक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. वेळ पडली तर आपण पुन्हा लष्करी वेशात सीमेवर दाखल होऊन पाक सैनिकांशी मुकाबला करण्यास तयार आहोत; असेही अण्णांनी पत्रकारांशी बोलताना सूचित केले.
भारताने पाकिस्तानला सन १९६५ मध्ये चांगलीच अद्दल घडविली होती. लाहोरवर भारतीय वायुदलाने सुरू केलेल्या बॉम्ब हल्ल्याचा धसका घेतलेल्या पाकिस्तानने त्यावेळी मदतीसाठी संयुक्त राष्ट्रसंघापुढे याचना केली होती. मात्र सध्या पाकिस्तान हा धडा विसरला असून त्याची आठवण करून देण्यासाठी भारताने पुन्हा सन १९६५ प्रमाणे धडक कारवाई करावी; अशी अपेक्षा अण्णांनी व्यक्त केली.
पाकिस्तानी सैनिकांनी ज्या पद्धतीने भारतीय सैनिकांची हत्या करून त्यांच्या मृतदेहाची विटंबना केली त्याचे कोणीही समर्थन करू शकत नाही. भारतीय जनता तर हे कधीही सहन करणार नाही; असेही अण्णा म्हणाले.