सैनिक विटंबना: संयुक्त राष्ट्रसंघाचा हस्तक्षेपाला भारताचा नकार

नवी दिल्ली: सैनिकांच्या विटंबनेचा विषय आंतराराष्ट्रीय स्तरावर नेण्याची भारताची तयारी नसून या प्रकरणी संयुक्त राष्ट्र संघाच्या निरिक्षकांचा हस्तक्षेप कदापि मान्य केला जाणार नाही; असे अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.

पाकिस्तानी सैनिकांनी मंगळवारी दोन भारतीय जवानांची हत्या करून त्यांच्या मृतदेहाची विटंबना केली. सैनिकांच्या विटंबनेचे कृत्य पाक सैनिकांकडून झाल्याचा पाकिस्तानने इन्कार केला आहे. भारत या विषयावर कांगावा करीत असल्याचा आरोप करून पाकिस्तानने या प्रकरणाची संयुक्त राष्ट्र संघाच्या निरिक्षक पथकाकडून चौकशी करण्याची मागणीही पाकिस्तानने केली. मात्र भारताने संयुक्त राष्ट्र संघाकडून चौकशीला तात्काळ नकार दिला आहे.

सैनिकांच्या विटंबनेचा विषय हा भारतीय सैन्यदलांच्या सन्मानाचा विषय असून या प्रकरणी सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक असल्याचे मत लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी व्यक्त केले. या प्रश्नात राजकारण न आणता सर्वांनी सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची आवश्यकताही त्यांनी प्रतिपादन केली.

भारतीय सैनिकांची विटंबना करण्याच्या प्रयत्नांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात नुकत्याच करण्यात आलेला नवा व्हिसाविषयक करार रद्द करण्याचा कोणताही विचार नसल्याचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले.भारत पाकिस्तान दरम्यान द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या दृष्टीने व्हीसाविषयक नियम शिथील करण्याचा करार काही आठवड्यापूर्वीच करण्यात आला.

सैनिकांची हत्या होण्यापूर्वी काही दिवस पूंछ विभागात लष्कर ए तोयबाचा कुख्यात दहशतवादी हाफीज सईद याचा वावर असल्याच्या वृत्ताला दुजोरा देऊन या घटनेमागे दहशतवादी संघटना असल्याची शक्यता नाकरता येत नसल्याचेही शिंदे यांनी सांगितले.