जाणून घ्या सोशल मीडियात व्हायरल झालेल्या ‘त्या’ कोसळलेल्या फ्लायओव्हरमागील सत्य


नवी दिल्ली – देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटामुळे सध्या लॉकडाऊन लागू आहे. या लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर केला जात आहे. सोशल मीडिया सध्याच्या घडीला एक असे माध्यम आहे, ज्यामुळे जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यात एखादी घटना घडली, की ती सर्वात आधी याच माध्यमातून आपल्या समोर येते आणि त्याचबरोबर ती व्हायरल होते. पण यातील किती मेसेज खरे आणि किती खोटे असतात याची पडताळणी आपल्याकडून होत नाही. सध्या असेच काही फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. ज्याखाली ही घटना मुंबई, पुणे किंवा बंगळूरुमध्ये घडली असल्याचा दावा करण्यात येत आहे. पण या मागचे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता काही वेगळीच माहिती समोर आली आहे.

सोशल मीडियात विशेष करुन व्हॉट्सअॅपवर फ्लायओव्हरचा भाग कोसळल्याचा फोटो व्हायरल झाला असून हा फोटो मुंबई, पुणे किंवा बंगळुरुचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. पण हा फोटो गुरुग्रामचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री हरियाणाच्या गुरुग्राममध्ये एका निर्माणाधीन फ्लायओव्हरचा काही भाग कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडली. दोन जण या दुर्घटनेत जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शनिवारी रात्री 11 च्या सुमारास सोहन रोडवर विपुल ग्रीन्सजवळील या फ्लायओव्हरचा काही भाग कोसळला. फ्लायओव्हरचे काम सुरू असून बादशाहपूर एलिवेटेड हायवेचा तो एक भाग आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन घटनस्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. हरियाणाचे मुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतची माहिती दिली आहे. ‘सोहना रोडवरील एलिवेटेड कॉरिडोरचा एक स्लॅब कोसळला, यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. प्रशासन घटनास्थळी दाखल झाल्याचे त्यांनी म्हटले होते.

सोशल मीडियावर पडलेल्या पुलाचा फोटो हा मुंबईचा, पुण्याचा, बंगळुरूचा म्हणून व्हायरल होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी अशी कोणतीही घटना घडलेली नसून हा फोटो पुण्याचा नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी यासंदर्भातील माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. मेट्रोचा निर्माणाधीन पूल कोसळल्याची छायाचित्रे समाज माध्यमातून, विशेषतः WhatsApp वरुन मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून ती छायाचित्रे पुण्यातील असल्याचा दावा केला गेला आहे. मात्र या दाव्यात कोणतेही तथ्य नसून अशी कोणतीही घटना पुण्यात घडलेली नाही. यासंदर्भात मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी माझे बोलणे झाले असून हा प्रकार पुणे शहरातील नाही. आपल्यालाही असे फोटोज आणि मेसेज आले असल्यास आपण फॉरवर्ड करू नका!, असे ट्विटमध्ये मोहोळ यांनी म्हटले आहे.