रावळपिंडी: पाकिस्तानी सैनिकांकडून दोन भारतीय सैनिकांची अमानुष हत्या होऊनही पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल अशफाक परवेझ कियानी यांनी कोणाच्याही धमकीला जशास तसे उत्तर देण्याची दर्पोक्ती केली आहे.

रावळपिंडी: पाकिस्तानी सैनिकांकडून दोन भारतीय सैनिकांची अमानुष हत्या होऊनही पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल अशफाक परवेझ कियानी यांनी कोणाच्याही धमकीला जशास तसे उत्तर देण्याची दर्पोक्ती केली आहे.
पाकिस्तानी सैनिकांनी मंगळवारी दोघा भारतीय सैनिकांची अमानुष हत्या केली. भारत सरकारने याबाबत कठोर भूमिका घेऊन या हत्येची चौकशी करण्याची सूचना पाकिस्तानला केली आहे.
या पार्श्वभूमीवर जनरल कियानी हे सियालकोट येथे गेले असताना त्यांनी पाकिस्तानच्या जवानांसमोर बोलताना ही दर्पोक्ती केली आहे. पाक जवानांनी कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सज्ज आणि सतर्क असावे; असेही त्यांनी सांगितले.
भारतीय सैनिकांच्या हत्या प्रकरणाला वेगळे वळण देण्यासाठी पाक लष्करानेही कांगावा करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय सैनिकांनी रविवारी पाकिस्तानच्या चौकीवर हल्ला केला. या हल्ल्यात पाक लष्कराचा नाईक अस्लम हा जवान ठार झाला. या घटनेवरून जगाचे लक्ष विचलित करण्यासाठी भारतंच पाक सैन्यावर खोटे आरोप करीत असल्याचा दावा पाक लष्कराच्या प्रवक्त्याने केला.