
वाराणसी, काशी, बनारस अशी अनेक नांवे असणारे उत्तर भारतातले हे ऐतिहासिक शहर हिंदू लोकांचा स्वर्ग मानले जाते. पवित्र गंगा नदी अनेक शहरांतून वाहात असली तरी वाराणसी म्हणजे गंगेचे शहर अशीही या शहराची ओळख आहे. कारण येथल्या गंगाकिनारी मृत्यू आल्यास अथवा दहन केले गेल्यास मोक्ष मिळतो अशी हिंदू धर्मियांची दृढ श्रद्धा आहे. हजारो वर्षांच्या इतिहास असलेले हे शहर अनेक गल्ल्याबोळ, गंगेकाठी बांधलेले असंख्य घाट, घाटावरची शेकडो मंदिरे आणि सूर्योदयाला गंगेत उभे राहून सूर्याला अर्घ्य देणारे शेकडो भाविक पाहण्यासाठी अवश्य भेट द्यावी असे ठिकाण आहे. तर्कविर्तक बाजूला ठेवून येथे अजोड श्रद्धेने आलेले भाविक हेही पाहण्यासारखे दृष्य असते. जगभरातून भारतभेटीवर येणारे पर्यटकही वाराणसीला भेट दिल्याशिवाय परतत नाहीत असे याचे महत्त्व आहे.

थंडीत असह्य थंडी आणि उन्हाळ्यात भाजून काढणारा उन्हाळा असे विषम हवामान असलेल्या या शहराला भेट देण्यासाठी आक्टोबर ते मार्च हा काळ सर्वात चांगला. वाराणसी पवित्र स्थळ असल्याने येथे जाण्यासाठी सर्व मार्ग म्हणजे रस्ते, विमान आणि रेल्वे मोठ्या संख्येने आहेत. मात्र शहरात फिरताना अरूंद गल्याबोळ असल्याने रिक्षा सोयीची ठरते. वाहतूक कोंडी हा इथला नित्याचा प्रकार

वाराणसीचे विश्वनाथ मंदिर हे गोल्डन टेंपल म्हणून ओळखले जाते. या मंदिरावर मुघल सम्राटांनी अनेक आक्रमणे केली. दहशतवाद्यांच्या लिस्टवर असल्याने आजही येथे कडक सुरक्षा व्यवस्था असून बॅग, पेन, कॅमेरे आत नेऊ देत नाहीत.जेवढे वेळा हे मंदिर उध्वस्त केले गेले तेवढे वेळा हिंदू राजांनी ते पुन्हा बांधले. दारात काळभैरव मंदिर असून काळभैरव म्हणजे शिवाचेच रूप मात्र ते मृत्यूचे प्रतीक मानले जाते. येथे मिळणारा काशीचा गंडा गळ्यात, हातात बांधायची प्रथा असून काशीयात्रा करणारे आपल्या नातेवाईकांसाठीही आवर्जून हे गंडे घेऊन येतात. वाराणसीत असंख्य देवळे आहेत. दुर्गा मंदिर, तुळशीमानस मंदिर, मनमंदिर ही कांही महत्वाची देवळे. त्याचबरोबर वेधशाळा आणि बनारस हिंदू विद्यापीठ आवर्जून भेट द्यावे असे. विद्यापीठाचा हिरवागार ,शांत परिसर मनाला भुरळ घालणारा. स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात हे विद्यापीठ पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणून ओळखले जात होते. आशियातील सर्वात मोठे निवासी म्हणजे रेसिडेन्शियल विद्यापीठ असलेल्या या विद्यापीठात १२४ स्वतंत्र विषयांचे विभाग आहेत.


