गुवाहाटी: शहरी ‘इंडिया’त पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव आणि आकर्षण असल्याने तिथे बलात्कार होतात; ग्रामीण भारतात नाही; असे विधान करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी खळबळ उडविली आहे. त्यांच्या या विधानावर सोशल मिडीयावरून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
आसाममधील सिलचर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना डॉ. भागवत यांनी हे विधान केले. असले प्रकार शहरी भागात अधिक घडतात कारण तेथे पाश्चात्य संस्कृतीचा पगडा अधिक आहे. पाश्चिमात्य मूल्यांचा प्रभाव वाढल्यामुळे इंडियात अशा घटना वारंवार घडत आहेत. याउलट भारतात जेथे भारतीय संस्कृती आणि मूल्ये यांचा प्रभाव अधिक आहे तेथे असे प्रकार क्वचितच घडतात; असेही डॉ. भागवत म्हणाले. महिलांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी नवीन कायदा करताना भारतीय संस्कृतीत महिलांकडे पाहण्याची जी वृत्ती आहे त्याचा विचार करून प्राचीन भारतीय मूल्ये लक्षात घेऊन तो केला जावा असेही मत त्यांनी व्यक्त केले.
सरसंघचालकांच्या या विधानावर सोशल मिडीयामधून सडकून टीका होत आहे.